मंत्री छगन भुजबळ यांना
जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र
नाशिक : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत असतानाच
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीकडून भुजबळ यांना हे पत्र पाठविले असून, त्यात पाच जणांनी भुजबळ यांना मारण्याची सुपारी घेतल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. भुजबळ फार्म येथील कार्यालयात हे पत्र आले आहे. दरम्यान, हे पत्र आल्यानंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून, त्यांनी सुरक्षेत वाढ केली आहे. या पत्रात मुजबळ यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी पाच जणांनी घेतली असून, हे पाचही जण भुजबळांच्या शोधात आहेत. ते केव्हाही त्यांना जीवे मारू शकतात. हे पाचही जण गंगापूर, दिंडोरी, चांदशी येथील हॉटेलमध्ये बसून असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पाचही जणांनी पन्नास लाख रुपयांची सुपारी घेतली आहे. या गुंडापासून भुजबळ साहेब तुम्ही सावध रहा,असा इशारा देण्यात आला आहे. एक मराठा लाख मराठा माफिया तुमचा गेम करणार असल्याचेही यामध्ये लिहिले आहे. या हल्लयासंदर्भातील एक मीटिंग हॉटेलमध्ये झाल्याचेही या पत्रात म्हटले आहे. हे पत्र तुमचाच हितचिंतक शिंदे देशमुख या नावाने पाठविले आहे. हे पत्र फेक आहे की खरे याचा पोलीस शोध घेत आहेत.