शिक्षणाची वाट होणार सुकर; गोंदेश्वर रोटरी क्लबचा समाजोपयोगी उपक्रम
सिन्नर : प्रतिनिधी
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील गोंदेश्वर रोटरी क्लबकडून तालुक्यातील पिंपळे माध्यमिक विद्यालयातील 15 आणि पुतळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील 3 अशा एकूण 18 गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप केले. गोंदेश्वरच्या या उपक्रमामुळे या विद्यार्थ्यांची पायपीट थांबून त्यांची शिक्षणाची वाट सुकर होणार आहे.
रोटरी क्लबसाठी दरवर्षी डिस्ट्रिक्ट ग्रँडमधून काही कॉमन प्रोजेक्ट येत असतात. त्यासंदर्भात प्रत्येक क्लबने डिस्ट्रिक्ट ग्रँडकडे मागणी करायची असते. गोंदेश्वर रोटरी क्लबने 18 सायकलची मागणी डिस्टिक ग्रँडला केली होती व ती डिस्ट्रिक्ट ग्रँडने मान्य केली. सायकलसाठी क्लब कडून काही प्रमाणात चार्जेस भरायचे असतात. सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथील माध्यमिक विद्यालयातील गरीब होतकरू असे 15 विद्यार्थी व पुतळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी 3 सायकलचे मोफत वाटप करण्यात आले.
यासाठी लागणारा सर्व खर्च माजी अध्यक्ष बाळासाहेब सदगीर व सेक्रेटरी दत्ता नवले यांनी केला. गोंदेश्वर रोटरी क्लबसाठी डिस्ट्रिक्ट ग्रँडकडून एकूण 72 हजार रुपयाच्या 18 सायकल मिळाल्या. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक यांना आमंत्रित करून हॉटेल पंचवटी येथे 18 सायकल हस्तांतरित केल्या. हे सर्व विद्यार्थी दररोज शाळेत 3 ते 4 किलोमीटर वरून पायी चालत चालत ये जा करतात. त्यांना सायकल मिळाल्याने रोजची पायपीट थांबणार असून, वेळेची बचत होण्याबरोबरच शिक्षणाचा मार्गही सुकर होणार आहे.
या प्रसंगी रोटरीचे अध्यक्ष सुरेश जोंधळे, सेक्रेटरी दत्ता नवले, किरण भंडारी, रवी मोगल, सुधीर जोशी, महेश बोराडे, राहुल शिंदे, कैलास शिंदे, प्रसाद पाटोळे, विनोद दंताळ, दीपक वर्पे, सतिश नेहे आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.