उर्जा विषयात संशोधनाला मोठ्या संधी – दादा भुसे

उर्जा विषयात संशोधनाला मोठ्या संधी – दादा भुसे
म.वि.प्र. आणि एम.एन.इ.पी.ए.,मेडा यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा व प्रदर्शनाचा समारोप
नाशिक ः प्रतिनिधी
विजेची कमतरता ही दिवसेंदिवस भासत असून नैसर्गिक ऊर्जास्रोत कधीतरी संपणार आहे.निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचा वापर मानव कल्याणासाठी केल्यास सकारात्मक परिणाम दिसतील. तसेच उर्जा विषयात संशोधनाला मोठा वाव असून तरुणांनी व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन राज्याचे ,देशाचे भवितव्य बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व बंदरे आणि खनिजकर्म मंत्री दादा भुसे यांनी केले ते महाराष्ट्र नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी प्रोड्युसर्स असोसिएशन (एम.एन.इ.पी.ए.) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था,महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट(एम.इ.डी.ए.),छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अपारंपरिक उर्जेची निर्मिती व वापर यावरील दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कर्म.बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात बोलत होते. यावेळी माजी मंत्री विजय नवल पाटील, मविप्र संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर,कोंडाजीमामा आव्हाड, रवींद्र जगताप,मिलिंद पाटील,ओम देशमुख,भागवत बाबा बोरस्ते,विलास बोरस्ते ,समन्वयक उदय रकिबे,अनिल जाधव, शिक्षणाधिकारी डॉ डी डी लोखंडे, प्राचार्य डॉ एस आर देवने, प्राचार्य डॉ आय बी चव्हाण ,प्राचार्य ज्योती लांडगे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सभापती बाळासाहेब क्षिरसागर होते.
पुढे बोलतांना भुसे यांनी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीसमोर अवकाळी पाऊस,रोगराई यासारखी संकटे उभी राहिली असून शेतीमधून वीज निर्मिती करणारे मॉडेल विकसित करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच नैसर्गिक उर्जेची उत्पादन किँमत जास्त असल्याने ती सर्वसामान्य माणसाला परवडतील अशी असावी,त्यासाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. सोलर उत्पादकांच्या मागण्या व ठराव शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शक्य ती मदत केली जाईल व अपारंपरिक उर्जेच्या संदर्भात मविप्र संस्थेने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
अध्यक्षीय मनोगतात सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना सबसिडी वाढून मिळावी ,अपारंपरिक उर्जा वापराबाबत सकारात्मकतेने विचार करावा असे सांगितले.
प्रास्ताविकात विजय नवल पाटील यांनी अपारंपरिक उर्जेच्या संदर्भातील 24वे अधिवेशन भरविले असून उत्पादक,विक्रेते व सरकार यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणे हा उद्देश आहे. शासनाकडून सुरु असलेल्या कुसुम योजनेत सुधारणा करावी,नवीन उद्योजकांना अनुदान द्यावे व ज्यादा दराने सोलरवरील तयार वीज खरेदी करावी असे ठराव करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन प्रा पंकज शेटे यांनी तर आभार डॉ अमोल काकडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *