युद्ध टाळण्याचा राजमार्ग द्विपक्षीय चर्चा

आशिया व युक्रेन यांच्यातील युद्धाला जवळपास चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. 2026 हे वर्ष उजाडते न उजाडते तो त्यात आणखी एका वर्षाची भर पडली. दोन देशांमध्ये झालेले असे दीर्घकालीन युद्ध जागतिक इतिहासात क्वचितच घडले असेल. या युद्धात किती जीवितहानी, वित्तहानी तसेच नैसर्गिक हानी झाली असेल याचा नेमका आकडा माहिती असला, तरी कल्पना करण्याच्या पलीकडे आहे. रशिया आणि युक्रेन हे शेजारी देश एकमेकांच्या जीवावर उठतील यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मुबलक आर्थिक संपत्ती, पाश्चिमात्य संस्कृती, नैसर्गिक सुबत्ता आणि जागतिक दर्जाची शिक्षणसंस्था अशा एकच नाही, तर अनेक गुणांनी युक्त अशा देशांत अशा प्रकारची दयनीय अवस्था खरोखरच निंदनीय आहे.
याच गोष्टीचा अधिक बारकाईने विचार केल्यास भारतही त्याला अपवाद नाही. रशिया आणि युक्रेनप्रमाणेच भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देशदेखील युद्धग्रस्त म्हणून जगात सर्वश्रुत आहेत.आपला शेजारी देश पाकिस्तान आपल्यावर कधी आक्रमण करेल आणि दोन्ही देश युद्धाच्या खाईत लोटले जातील, याची काहीच शाश्वती देता येत नाही.
पहलगाम येथील निष्पाप व नि:शस्त्र भारतीय नागरिकांवरील झालेला पाकिस्तानचा अवसानघातकी वार हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणजे त्यास दिलेले केवळ प्रत्युत्तर नसून पहलगाम विजयासहितच कारगिल विजय दिनाची पुनरावृत्ती असून, प्रत्येक भारतीय नागरिकाची स्वप्नपूर्ती आहे. धुमसते काश्मीर, दहशतवादी संघटना, त्यांच्या छुप्या कारवाया, पाकव्याप्त काश्मीर ही आपली डोकेदुखी पूर्वापारपासून आजतागायत तशीच आहे. दोन युद्धे, कारगिलची घटना आणि दैनंदिन अतिरेकी हल्ले यांच्यातून आपल्याला एकच समाधानाची बाब सांत्वन देते ती म्हणजे, दोन्ही देशांत करण्यात आलेली युद्धबंदी आणि वेळोवेळी करण्यात येणारे सामंजस्य करार! शांततेच्या मार्गाने आणि एकमेकांशी द्विपक्षीय चर्चेतून समस्या सोडवणे, हा एकच युद्ध टाळण्याचा राजमार्ग आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाने जागतिक वातावरण ढवळले गेले आहे. संयुक्त राष्ट्र संघटना आणि नाटो राष्ट्र संघटना यांसारख्या जगप्रसिद्ध संघटनासुद्धा या दोघांमधील भांडण मिटविण्यासाठी अद्याप संपूर्ण यशस्वी ठरल्या नाही, हे एक फार मोठे नवल आहे. युक्रेन शांतताप्रिय असून, त्यांना युद्ध नको आहे.जगातील बहुतेक देश त्यांच्या पाठीशी मदतीचा हात घेऊन उभे असले तरी बलाढ्य रशिया त्यांच्या नाकी नऊ आणत आहे. हे जर भविष्यात असेच चालू राहिले तर दोघांकडे अण्वस्त्रांचा उपयोग करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. जर तसे झालेच तर जगातील इतर देशांना त्यांना परावृत्त करण्यासाठी उडी घ्यावी लागेल. यापूर्वीची दोन्ही जागतिक महायुद्धे अशाप्रमाणेच छोट्याशा ठिणगीतून झालेल्या मोठ्या भांडणासारखी होती. त्यामुळे हीच तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी ठरू नये, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, सम्राट अशोक, तसेच गौतम बुद्ध यांसारख्या महान विचारवंतांनी जगाला दिलेल्या शांतता व सलोख्याची शिकवण रशिया व युक्रेन यांसारख्या पाश्चिमात्य देशांना करून देणे आज आवश्यक आहे.
एकदा भगवान बुद्ध रणरणत्या उन्हात पायी जात होते. तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वटवृक्षाखाली एक युवक मोठ्या रागाने झाडाची पाने तोडून फेकत होता. बुद्धांनी त्याचे कारण विचारले असता, तो म्हणाला की, घरगुती कलहामुळे तो आपला राग त्या झाडाच्या पानांवर काढत आहे. हे ऐकून बुद्धांनी खाली पडलेले एक पान उचलून त्याला एवढेच सांगितले की, ज्या फांदीच्या देठापासून तू हे पान विलग केले आहेस तेथेच ते पुन्हा जोडून दाखव. यावर स्मितहास्य करून तो युवक म्हणाला की, हे कसे शक्य आहे?
त्याच्या स्पष्टीकरणार्थ बुद्धांनी असे सांगितले की, ज्याप्रमाणे एकदा झाडापासून वेगळे केलेले पान पुन्हा जोडता येत नाही त्याप्रमाणेच रागाच्या भरात केलेले कोणतेही कृत्य हे सर्वस्वी विनाशाकडे नेते.
युद्ध नको बुद्ध हवा याची प्रचिती येऊन दोन्ही देश आपापसांत सामंजस्य करार व युद्धबंदी यांसारख्या मार्गांचा अवलंब करून पुन्हा पूर्वीसारखे गुण्यागोविंदाने नांदतील तर जगाला त्यातून शिकण्यासारखे आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.
दूध मांगोगे तो खीर देंगे।
काश्मीर मांगोगे तो
ऑपरेशन सिंदूर देंगे ॥

Bilateral talks to avoid war

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *