भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची आज (दि. 15) जयंती. जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांचीजवळील लिहती या खेडेगावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगमा मुंडा, तर आईचे नाव करमी हातू असे होते. त्यांचे वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती गरिबीची असूनही त्यांना इंग्रजी माध्यमाच्या चाईबासा इंग्लिश मिशनरी स्कूलमध्ये शिक्षणाची संधी मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे त्यांच्यावर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. बिरसा मुंडा जरी इंग्रजी शाळेत शिकत असले तरी त्यांना भारतीय संस्कृतीचा अभिमान होता. 1878-79 मध्ये ब्रिटिशांनी वन कायद्यात बदल केला.
या नव्या कायद्यानुसार आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जंगलांवर ब्रिटिशांची मालकी झाली. या कायद्यामुळे आदिवासींवर बेघर होण्याची वेळ आली. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी फळे, कंदमुळे, लाकूडफाटा अथवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली. आदिवासींच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. या कायद्याविरोधात आदिवासींनी न्यायालयात दाद मागितली, पण तिथेही त्यांना न्याय मिळाला नाही. 1884 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. दुष्काळ आणि उपासमारीने अनेक लोक मरण पावले. जननायक बिरसा मुंडा यांनी या काळात आदिवासी समाजाची निःस्वार्थ सेवा केली. भीषण दुष्काळात लोक उपासमारीने मरत असताना लोकांप्रति संवेदना व्यक्त करण्याऐवजी जुलमी ब्रिटिश सरकारने अवाजवी शेतसारा आकारला. ब्रिटिशांनी आकारलेल्या अवाजवी शेतसार्याला जमीनदार आणि जहागीरदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे चिडलेल्या बिरसा मुंडा यांनी जनआंदोलन उभारले. हे जनआंदोलन जहागीरदार व जमीनदारांच्या शोषणाविरुद्ध होते. आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या जनआंदोलनात सहभागी होऊ लागल्याने हे आंदोलन दडपण्यासाठी जहागीरदार आणि जमीनदारांच्या माध्यमातून ब्रिटिशांनी बिरसा मुंडा यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 1885 साली बिरसा मुंडा यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना हजारीबागच्या तुरुंगात पाठवण्यात आले. तुरुंगात असतानाच त्यांनी जुलमी ब्रिटिश सरकार उखडून टाकण्याचा संकल्प केला. दोन वर्षांची शिक्षा भोगून आल्यावर त्यांनी आदिवासी समाजाला संघटित करून ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा पुकारला. 1887 मध्ये बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने ब्रिटिशांविरुद्ध अनेक लढाया करून त्यांना जेरीस आणले. या लढाया त्यांनी पारंपरिक शस्त्रांनी म्हणजे भाले, तलवारी, धनुष्यबाण यांच्या सहाय्याने लढल्या. दुर्गम, डोंगराळ भागातून पारंपरिक पद्धतीने लढा उभारून त्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले.
बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखालील आदिवासी समाज आपल्याला दाद देत नाही, हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी अतिरिक्त कुमुक मागवली आणि आदिवासींवर हल्ला केला. त्यात 400 आदिवासी बांधव शहीद झाले. तरीही बिरसा मुंडा यांनी हार मानली नाही. त्यांनी आपली लढाई चालूच ठेवली. 1890 मध्ये बिरसा मुंडा डोमवाडी पहाडात आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. भीषण लढाई झाली. बिरसा मुंडा यांना अटक करून रांचीच्या कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. 20 मे 1900 रोजी त्यांना एकांत कोठडीत ठेवण्यात आले. एकांत कोठडीत जेवण करण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला. न्यायालयातच ते बेशुद्ध पडले. त्यांना न्यायालयातून कारागृहात आणण्यात आले. औषधोपचार करण्यात आले. त्यांची तब्येत सुधारली. मात्र, 9 जून 1900 रोजी त्यांना रक्ताची उलटी झाली. ते बेशुद्ध पडले व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृत्यू एशियाटिक कॉलरा या आजाराने झाला, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले असले, तरी त्या आजाराची कोणतेही लक्षणे त्यांच्या शरीरावर दिसत नव्हते. त्यामुळेच ब्रिटिशांनी त्यांची हत्या केली, असा संशय इतिहासकार व्यक्त करतात. नेपोलियनला जसे आर्सेनिक देऊन ठार मारले. तीच लक्षणे बिरसा मुंडा यांच्या शरीरावर दिसत होती. शिवाय त्यांना कारागृहातच दफन करून पुरावा नष्ट करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जननायक बिरसा मुंडा यांचे योगदान अतुलनीय असे आहे. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभारून त्यांनी जे कार्य केले त्याला तोड नाही. त्यामुळेच त्यांना आदिवासी जननायक हा किताब जनतेने बहाल केला. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांना जयंतीदिनी अभिवादन!