भारताच्या राजकारणात शरद पवार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या शरद पवारांनी देशातील राजकारणात अनेक प्रयोग केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या दहा वर्षांतच त्यांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणताना विरोधी पक्षांची मोट बांधून पुरोगामी लोकशाही दलाची (पुलोद) मोट बांधून राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी आणि नंतर त्यांच्या पुलोदमध्ये पूर्वीच्या जनसंघाचे आणि आताच्या भाजपाचे आमदारही होते. सन १९८६ साली त्यांनी आपली समाजवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन केल्याने पुलोद मोडकळीस आली. काँग्रेसमध्ये असताना पंतप्रधान होण्याची त्यांची संधी हुकली. देशातील सर्व पक्षांचे नेते त्यांचे मित्र आहेत. त्यापैकी समविचारी आणि डाव्या पक्षांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात. सोनिया गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्यास विरोध केल्याने काँग्रेसमधून गच्छंती झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
समाजवादी काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी काँग्रेसची संस्कृती सोडली नाही आणि सडेतोड भूमिका घेण्यास मागेपुढेही पाहिले नाही. सांगायचे तात्पर्य इतकेच की, पुलोद वगळता शरद पवार कधीच भाजपाच्या जवळ गेले नाहीत की, भाजपाला जवळही केले नाही. शरद पवारांवर ८३ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव पडला. अनेक विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेत्यांचा समावेश! शुभेच्छांचा स्वीकार करुन त्यांनी आपला वाढदिवस आपल्या विरोधकांवर आसूड ओढून साजरा केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवारांनी कदाचित प्रथमच पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला असावा. समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे ‘सरकारी’ उद्घाटन करताना मोदींनी विरोधी पक्षांवर केलेली टीका संकेतभंग करणारी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ‘भीक’ शब्द वापरला नसता, तर शाईफेक झाली नसती’, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘समृद्धी’ला विरोध केल्याचा शिंदेंचा आरोपही त्यानी तकलादू ठरविला.
समृध्दी आणि शाईफेक
मोदी यांनी रविवारी समृद्धी महामार्गासह विविध विकासकामांचे उद्घाटन केले. याप्रसंगी मोदींनी विरोधकांवर केलेल्या शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. सरकारी कार्यक्रमातून विरोधकांवर टीका करणे कितपत योग्य? असा सवाल त्यांनी केला. सरकारी कार्यक्रमांत राजकीय टीकाटिप्पणी करू नये, असा एक संकेत आहे. त्याचे भान मोदींना नाही, हेच पवारांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या वतीने किंवा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर सभेत पक्षाची भूमिका मांडली किंवा विरोधकांवर टीकाटिप्पणी केली, तर तो त्यांचा १०० टक्के अधिकार आहे. पण, रेल्वेचे, रस्त्याचे किंवा हॉस्पीटलचे उद्घाटने अशा सरकारी सरकारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका करणे कितपत शहाणपणाचे आहे? असा सवाल पवारांनी मोदींना केला. त्यांनी मोदींची चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला असला, तरी समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचा असल्याचेच चित्र रंगविण्यात आले आणि महामार्ग मार्गी लागल्याचे श्रेयही घेण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून त्यानंतरचे वेगवेगळ्या पंतप्रधानांनी सरकारी कार्यक्रमांत विरोधक, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष यांच्यावर टीका केली नाही, तर लोकशाहीच्या संस्था म्हणून त्यांचा सन्मान ठेवला. पण, आज हेच संकेत पाळले जात नाही, असे पवारांनी मोदींच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. “काही जणांनी या समृद्धी महामार्गाला विरोध केला,” असे विधान करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावणारे मुख्यमंत्री एकनाथ यांचाही पवारांनी समाचार घेतला. महामार्गाला आमचा विरोध नव्हता, तर शेतकर्यांच्या जमिनींना रास्त भाव द्या, ही मागणी होती. अशा प्रकारची मागणी करणे म्हणजे महामार्गाला विरोध करणे, असा अर्थ होत नाही, हेही पवारांनी स्पष्ट करुन शिंदेंची टीका फोल ठरविली. चंद्रकात पाटील यांनी केलेल्या विधानावरही यानिमित्ताने पवारांनी प्रथमच भाष्य केले. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याचे कधीही समर्थन करणार नाही, पण ‘भीक’ हा शब्द वापरणे चुकीचे तो वापरला नसता, तर शाईफेक झाली नसती, याची जाणीवही त्यांनी करुन दिली. महात्मा फुले, डाँ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समाजासाठीचे योगदान मोठे आहे. त्यांनी समाजासाठी ‘भीक’ मागितली असे म्हणणे चुकीचेच आहे. गरीब विद्यार्थ्यांना दोन वेळचं जेवण मिळण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी दागिने विकले होते, ्य आहे. कर्मवीरांनी ‘कमवा आणि शिका असे सांगितले ‘भीक मागा’ असे नव्हे, अशा शब्दात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले.
संकेत आणि विचारभंग
भाजपाची देशात सत्ता आल्यापासून विरोधी पक्षांना पाण्यात पाहण्याची मोहीमच पंतप्रधानांलह केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्यांनी हाती घेतली असेल, तर कार्यक्रम सरकारी की पक्षीय याचा विचार करण्याची गरज राहिलेली नाही. अर्थात, शरद पवारांनी घेतलेल्या समाचाराची भाजपाकडून दखल घेतली जाईलच, असे नाही. सध्या महाराष्ट्रात वादग्रस्त विधाने करण्याची एक चढाओढ सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या विभूतींविषषी उलटसुलट विधाने केली जात आहेत. समृध्दी महामार्ग उद्घाटन कार्यक्रमात विरोधी पक्षांवर झालेली टीका संकेतभंग करणारी असू शकते. पण, या कार्यक्रमात इतिहासातील विभूतींविषषी कोणीही वक्तव्य केले नाही, हे एक महाराष्ट्राचे नशीबच. इतिहासातील नेत्यांविषयी केली जाणारी विधाने संकेतभंग करणारी नाही, तर विचारभंग करणारी आहेत. दोन्हींचा समाचार शरद पवारांनी वाढदिवस साजरा करताना घेतला. त्यांचा रोख अर्थातच, भाजपावरच होता. भाजपा हाच आपला खरा राजकीय प्रतिस्पर्धी असल्याचे त्यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित केले.