बहुचर्चित वाघाडी, फुलेनगर झोपडपट्टीसह संमिश्र लोकवस्ती असलेल्या या भागात 1992 ते 2002 दरम्यान काँग्रेसचे वर्चस्व होते. यात 1992 ते 1997 दरम्यान डॉ. शोभाताई बच्छाव यांनी नेतृत्व केले होते. 2002 दरम्यान पुन्हा डॉ. शोभाताई बच्छाव आणि चंद्रकांत निकम व गोटीराम वरघडे यांनी प्रतिनिधित्व केले. 2007 मध्ये बहुजन समाजवादी पार्टीकडून प्रा. कविता कर्डक आणि राष्ट्रवादीकडून पुन्हा गोटीराम वरघडे हे या भागातून निवडून आले होते. त्यानंतर 2012 मध्ये कविता कर्डक यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. तर मनसेकडून डॉ. विशाल घोलप याच भागातून निवडून आले होते. जवळपास 15 वर्षे काँग्रेस पक्षाने या भागात आपले वर्चस्व ठेवले होते. 1992 मध्ये याच भागात विजय पाटील यांनीही नेतृत्व केले. त्यानंतर बहुजन समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी नेतृत्व केले. 2017 नंतर मात्र भारतीय जनता पार्टीने या भागात आपले मूळ रोवले. त्यानंतर गत दहा वर्षांपासून या भागात भाजपने आपले वर्चस्व कायम राखले.
या भागाला कालांतराने डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या रूपाने महापौर, आमदार आणि राज्यमंत्रिपदही मिळाले. तसेच विजय पाटील यांच्या रूपाने स्थायी समिती सभापतिपदही मिळाले होते. या भागाचा विस्तार वाढल्याने या प्रभागात नामको कॅन्सर हॉस्पिटल मागील परिसर, शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड, सीडीओ मेरी, आदिवासी वसतिगृह परिसर, मेरी वसाहत, तारवालानगर, लामखेडे मळा, वज्रेश्वरी झोपडपट्टी, फुलेनगर, वैशालीनगर, भराडवाडी, सम्राटनगर, कालिकानगर, राहुलवाडी, वाल्मीकनगर, संजयनगर, महालक्ष्मी थिएटर परिसर, लोकसहकारनगर, आदित्य कुंज, हॉटेल सुविधा आदी येतो.
संमिश्र लोकवस्ती आणि बहुभाषिक मतदार या भागात राहतात. गुजराथी आणि पटेल समाजाचे मतदान अधिक प्रमाणात आहे. वज्रेश्वरी झोपडपट्टी, फुलेनगर, वैशालीनगर, भराडवाडी, सम्राटनगर, कालिकानगर, राहुलवाडी, वाल्मीकनगर, संजयनगर या परिसरात तीन ते चार वाजेपर्यंत मतदार मतदानासाठी बाहेर पडत नाहीत. तर लक्ष्मीदर्शनानंतरच चार वाजेनंतर या परिसरातील मतदान केंद्रांवर रांगाच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत. दरम्यान, या वेळच्या निवडणुकीत तर साडेपाच वाजेनंतर एकही मतदार मतदान केंद्राच्या बाहेर दिसला नसल्याचे प्रथमच आढळून आले. 2012 मध्ये या प्रभागातून हेमंत शेट्टी, जगदीश पाटील, सरिता सोनवणे, स्व. शांताबाई हिरे यांनी प्रभागाचे नेतृत्व केले. मात्र, यावेळी प्रभागातील माजी सभागृहनेते इंजि. जगदीश पाटील यांना फुलेनगरमधील राहुलवाडी येथे सागर जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार करणार्या प्रतिस्पर्धी टोळीसोबत गटात सहभागी असल्याच्या आरोपावरून त्यांना कारागृहात जावे लागले. त्यामुळे साहजिकच जगदीश पाटील यांच्या कुटुंबातून कोण निवडणूक लढवतो, याकडे लक्ष लागले होते. परंतु, त्यांच्या कुटुंबातून कोणीही निवडणूक लढवली नाही. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात चुरशीची लढत झाली.
मनसेच्या उमेदवारांमुळेदेखील शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येते. अ गटात स्व. शांताबाई हिरे यांच्या स्नुषा मोनिका हिरे यांनी माजी नगरसेविका कविता कर्डक यांचा 2892 फरकाच्या मतांनी पराभव केला. ब गटात सरिता सोनवणे यांनी सविता जाधव यांचा 2151 मतांच्या फरकांनी पराभव केला. याच गटात मनसेच्या निकिता दोंदे यांनी 2164 इतकी मतं घेतल्याने सरिता सोनवणे यांचा विजय सुकर झाला. क गटात तिरंगी लढत झाली. यात इंजि. सागर लामखेडे यांनी सचिन ढिकले यांचा 2495 मतांच्या फरकांनी पराभव केला. शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार महेश शेळके यांनी 2616 मतं घेतल्याने इंजि. सागर लामखेडे यांचा विजय सुकर झाला. ड गटातही तिरंगी लढत झाली. यात हेमंत शेट्टी यांनी सतनाम राजपूत यांचा 1879 मतांच्या फरकांनी पराभव केला. यात मनसेच्या कविता कुलकर्णी यांनी 2155 इतकी मतं घेतली. त्यामुळे हेमंत शेट्टी यांचा विजय सुकर झाला.
यात ब गटातून भाजपच्या सरिता सोनवणे यांना 9802 इतकी मतं मिळाली. तर शिवसेना शिंदे गटाच्या सविता जाधव यांना 7651 आणि मनसेच्या निकिता दोंदे यांना 2164 इतकी मतं मिळाली. त्यामुळे सविता जाधव आणि निकिता दोंदे यांच्या मतांची बेरीज केली तर 9815 इतकी मतं होतात आणि सरिता सोनवणे यांना 9802 इतकी मतं मिळाली असून, दोंदे यांच्या मतांचा फटका सविता जाधव यांना बसला. क गटातून भाजपचे इंजि. सागर लामखेडे यांना 10629 तर शिवसेना शिंदे गटाचे सचिन ढिकले यांना 8143 आणि शिवसेना उबाठा गटाचे महेश शेळके यांना 2616 इतकी मतं मिळाली. ढिकले आणि शेळके यांच्या मतांची बेरीज केली तर 10750 इतकी मतं होतात. त्यामुळे शेळके यांनी घेतलेल्या मतांचा फटका ढिकले यांना बसला.
ड गटातून भाजपचे हेमंत शेट्टी यांना 9035, शिवसेना शिंदे गटाचे सतनाम राजपूत यांना 7426, मनसेच्या कविता कुलकर्णी यांना 2155 इतकी मतं मिळाली. राजपूत व कुलकर्णी यांच्या मतांची बेरीज केली तर 9581 इतकी बेरीज होते. त्यामुळे कविता कुलकर्णी यांनी घेतलेल्या मतांचा राजपूत यांना फटका बसल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
BJP dominates even in mixed population and slum wards