नाशिक महापालिकेत एकहाती सत्ता
72 जागांवर विजय, शिंदेसेनेची गाडी 26 वर अडकली
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेवर शंभर प्लसचा नारा देणार्या भाजपने 72 जागा जिंकत महापालिकेवर पुन्हा एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपला आव्हान देऊन महापौर पदाचे स्वप्न पाहणार्या शिंदेसेनेच्या झोळीत नाशिककरांनी अवघ्या 26 जागा टाकल्या. ठाकरे गटाने 15 जागा जिंकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, भाजपने गतवेळेपेक्षा सहा जागा अधिक मिळवत पुन्हा वर्चस्व मिळवले. भाजपच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागल्याने ही निवडणूक चर्चेत राहिली.
शिंदेसेनेला आत्मविश्वास नडला
नगरपालिका निवडणुकीत मोठा भाऊ झाल्यानंतर या यशाने हुरळत जाऊन व भाजपच्या बंडखोरांना उमेदवारी देऊन नाशिकमध्ये सत्ता आपलीच, असा अतिआत्मविश्वास शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये दिसत होता. त्यामुळेच नाशिक मनपावर आमचाच महापौर बसणार हे बोलून दाखवले जात होते. मात्र, शिंदेसेनेच्या अनेक ठिकाणी हक्काच्या जागा भाजपने हिसकावल्या. 2017 साली निवडून आलेल्या माजी नगरसेवकांची संख्या शिंदेसेनेकडे पन्नासपर्यंत गेल्याचे चित्र होते. त्यांपैकी अवघ्या 26 ठिकाणी मर्यादित यश मिळाल्याने याचे आत्मचिंतन पदाधिकार्यांना करावे लागणार आहे.
मनपात बहुमताचा आकडा 62 असून, भाजपच्या 72 जागा निवडून आल्याने त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दरम्यान यंदा पाच टक्क्यांनी मतदानात घट होऊन हा आकडा 57 टक्क्यांवरच थबकला. मुख्य म्हणजे 2017 च्या महापालिका निवडणुकीत 62 टक्के मतदान झाले होते. यंदा टक्केवारी घसरल्याचे दिसून आले. घटलेल्या मतदानाचा फायदा निकालातून भाजपला झाल्याचे दिसून आले.
भाजपने नाशिक महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशकात मुक्काम ठोकला होता. विशेषत: भाजपात ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने उमेदवारी नाकारल्याने मोठा रोष निष्ठावंतांचा पाहावयास मिळाला होता. त्यामुळे भाजपला कुठेतरी याचा फटका बसेल अशी चर्चा होती. परंतु भाजपने पूर्ण ताकदीनिशी लढत 72 जागा निवडून आणत नाशिकमधील ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. याद्वारे शिंदेसेनेच्या महत्त्वाकांक्षांनाही सुरुंग लावत भाजपला सत्तेसाठी कोणाच्याही पाठिंब्याची आवश्यकता नसल्याचे दाखवून दिले. भाजपला महापालिका निवडणुकीत धडा शिकवायचा. अन् जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा चंग शिंदेसेनेचे मंत्री दादा भुसे, मा. खा. हेमंत गोडसे यांनी केला होता. याकरिता शहरभर त्यांनी उमेदवारांचा जोरदार प्रचारही केला. मात्र, भाजपने पुन्हा एकदा महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करत नाशिकला बालेकिल्ला बनवले. राज-उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेचा फायदा ठाकरे गटाला झाल्याचे दिसले. शिंदेसेनेचे मुख्य नेते, उपमुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी देखील हुतात्मा अनंत कान्हैरे मैदानावर सभा घेत नाशिककरांना सत्ता देण्याचे आवाहन केले होते.
2017 मधील पक्षीय बलाबल
भाजप- 66, शिवसेना 35 राष्ट्रवादी कॉग्रेस-6 कॉग्रेस-6 मनसे – 5 अपक्ष – 4
यांची पहिल्यांद्याच होणार मनपात एन्ट्री – अमोल पाटील, संगीता घोटेकर, भारती धिवरे, अंकिता शिंदे, कविता लोखंडे, विश्वास नागरे, समाधान देवरे, मानती शेवरे, सोनाली भंदुरे, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, राहुल शेलार, आदिती पांडे, मयूरी पवार, सामिया खान, नाझीया अत्तार, जागृती गांगुर्डे, सीमा पवार, रूपाली नन्नावरे, दीपाली गीते, संध्या कुलकर्णी, सुनिता भोजने, प्रमिला मैंद, योगेश भोर, रुचिरा साळ्वे, योगेश गाडेकर, प्रविण जाधव, रिद्धेश निमसे, नामदेव शिंदे, ऐश्वर्या लाड, इंदूमती खेताडे, जुई शिंदे, गौरव गौवर्धने, मोनिका हिरे, सागर लामखेडे, नीलम पाटील, चंद्रकला धुमाळ, प्रमोद पालवे, वाळू काकड, रोहिणी पिंगळे, चित्रा तांदळे यांना मनपा सभागृहात नव्याने संधी मिळाली आहे.
BJP is the one who is the boss!