भाजप- शिवसेना शिंदे गट युतीवरून भाजपमध्ये दोन गट

बंडू बच्छाव, अद्वय हिरे, सुनील गायकवाड यांचा युतीला कडाडून विरोध

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस उरला असताना भाजप- शिवसेना शिंदे गट युतीबाबत स्पष्टता दिसून येत नाही. यातच युती करण्यावरून भाजपमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. मालेगावात भाजपचे दोन गट पडले असून, युतीबाबत नेत्यांनी विरोध दर्शवला आहे.
मालेगावमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटाची युती व्हावी, अशी अपेक्षा वरिष्ठ पातळीवरून व्यक्त झाली होती. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक स्तरावर चर्चा व बैठका पार पडल्याची माहिती आहे. परंतु, भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, महानगरप्रमुख देवा पाटील यांच्यासह काही पदाधिकारी युती करण्याच्या बाजूने आहेत. बंडूकाका बच्छाव, अद्वय हिरे व सुनील गायकवाड यांनी युतीला कडाडून विरोध दर्शविला आहे. मंगळवारी (दि. 30) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून, सोमवारी सायंकाळपर्यंत भाजप- शिंदे गट युतीबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती.

मालेगावमध्ये भाजपची ताकद आज वाढलेली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पक्ष उभा आहे. अशा परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाशी युती केल्यास अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी, हीच आमची ठाम भूमिका आहे.
– अद्वय हिरे, भाजप नेते

यंदा मालेगाव महापालिकेची निवडणूक भाजपसाठी अनुकूल आहे. अनेक जुने निष्ठावान कार्यकर्ते निवडून येण्याच्या स्थितीत आहेत. मात्र, युती केल्यास त्यांची संधी हिरावली जाईल आणि पक्षाचे नुकसान होईल. त्यामुळे युती झाल्यास मी स्वतः निवडणूक लढवणार नाही.’
– सुनील गायकवाड, माजी नगरसेवक

शिवसेना शिंदे गटाशी युती केल्यास नांदगाव नगरपरिषदेप्रमाणेच भाजपचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मालेगावात भाजप स्वतंत्रपणे 24 जागांवर उमेदवार उभे करू शकतो. युतीचा निर्णय झाला तर मी निवडणुकीत तटस्थ भूमिका घेईन. – बंडूकाका बच्छाव, भाजप नेते

युती झाल्यास तटस्थ राहण्याचा इशारा

शिंदे गटाशी युती केल्यास भाजपचे नुकसान होईल, असा दावा करत बंडूकाका बच्छाव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. नांदगाव नगरपरिषदेतील अनुभवाची पुनरावृत्ती मालेगावात होईल, असा इशाराही त्यांनी दिला. युती झाल्यास आपण निवडणुकीत तटस्थ भूमिका घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सुनील गायकवाड यांनीही युती झाल्यास स्वतः निवडणूक न लढवण्याची भूमिका जाहीर केली आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी, असेही अद्वय हिरे यांनी म्हटले आहे.

युतीवरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह

मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाशी युती करावी की नाही, यावरून भाजपमध्ये स्पष्टपणे दोन गट पडले आहेत. जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे व महानगरप्रमुख देवा पाटील यांच्यासह काही पदाधिकारी युतीच्या बाजूने आहेत. बंडूकाका बच्छाव, अद्वय हिरे व सुनील गायकवाड यांनी युतीला तीव्र विरोध दर्शविला आहे. या मतभेदांमुळे नामनिर्देशन अर्जांच्या अंतिम टप्प्यातही युतीचा निर्णय प्रलंबित आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *