सोडत निघताच नाशकात घडामोडी
दीपाली गिते, हिमगौरी आडके, योगिता हिरे, माधुरी बोलकर, स्वाती भामरे यांची नावे चर्चेत
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकसह राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी मुंबईत महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी नाशिक महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेला सुटले आहे. दरम्यान, भाजपकडून कोणाला महापौरपदाची संधी मिळणार? यावरून विविध नावांवरून शहरभरात चर्चा रंगली आहे.
यात माजी स्थायी सभापती गणेश गिते यांच्या पत्नी दीपाली गिते, माजी स्थायी सभापती हिमगौरी आडके, स्वाती भामरे यांच्यासह इतर महिलांच्या नावांची गुरुवारी दिवसभर चर्चा सुरू होती. दरम्यान, चांगला चेहरा नाशिकच्या महापौरपदासाठी दिला जाणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले आहे. महापौर निवडीत आमदारांचे लॉबिंग, वरिष्ठ नेत्यांची भूमिका आणि कोअर कमिटीतील गणित यावर अंतिम निर्णय अवलंबून असेल. भाजप ऐनवेळी धक्कातंत्र वापरून नवख्या चेहर्याला संधी देणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन वर्षांनी शहरात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, हा काळ नाशिक शहरासाठी आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचे देशभरच नव्हे, तर जागतिक पातळीवर ब्रॅण्डिंग करण्याची संधी भाजपला मिळणार आहे. त्यामुळेच प्रशासकीय समज, राजकीय तोल आणि स्वच्छ प्रतिमा असलेला महापौर देणं भाजपसाठी अत्यावश्यक ठरणार आहे.
दोन-तीन दिवसांत नाव जाहीर
आरक्षणावर पडदा पडल्यानंतर भाजपकडून येत्या दोन-तीन दिवसांत महापौरपदाचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी गटनोंदणी महसूल आयुक्तांकडे केली जाणार आहे.
BJP tussle for ‘Mayor’