सिडकोतील तीन प्रभागांत वेगवेगळा कौल; 27 मध्ये संमिश्र विजय
सिडको : वार्ताहर
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक 27, 29 आणि 31 मधील निकालांनी राजकीय समीकरणांकडे लक्ष वेधले आहे. प्रभाग क्रमांक 27 मधून भाजपाचा एक, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा एक नगरसेवक निवडून आला आहे. प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपाचे तीन उमेदवार तर एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवत लक्षवेधी निकाल दिला आहे. तर प्रभाग क्रमांक 31 मधून शिवसेना (उबाठा) गटाच्या दोन नवख्या महिला उमेदवारांसह भाजपाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत.
प्रभाग क्रमांक 27 अ मधील अनुसूचित जाती महिला गटातून भाजपाच्या प्रियांका दोंदे विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या आशा खरात यांचा पराभव केला. ब गटातून अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)चे किरण राजवाडे विजयी झाले असून, त्यांनी भाजपाच्या ज्योती कवर यांचा पराभव केला. क गटातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेवर शिवसेनेच्या किरण गामणे यांनी विजय मिळवला. त्यांनी माजी नगरसेविका कावेरी घुगे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. ड गटातून सर्वसाधारण जागेवर शिवसेनेचे नितीन दातीर विजयी झाले असून, त्यांनी भाजपाच्या रामदास दातीर यांचा पराभव केला.
प्रभाग क्रमांक 29 अ मधून भाजपाकडून बंडखोर म्हणून हकालपट्टी झालेले अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपाचे उमेदवार दीपक बडगुजर, भाजप नेते सुधाकर बडगुजर यांचे पुत्र, तसेच शिवसेनेचे जनार्दन नागरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. प्रभाग 29 ब मधून भाजपाच्या योगिता हिरे यांनी शिवसेनेच्या श्रद्धा पाटील आणि मनसेच्या वर्षा वेताळ यांचा पराभव करत विजय मिळवला. क गटातून भाजपाच्या छाया देवांग यांनी शिवसेनेच्या सुमन सोनवणे तसेच शिवसेना (उबाठा) गटाच्या मोनिका वराडे यांचा पराभव केला. ड गटातून भाजपाचे भूषण राणे विजयी झाले असून, त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे देवाभाऊ वाघमारे, शिवसेना शिंदे गटाचे जितेंद्र जाधव, मनसेचे संदेश जगताप आणि वंचित बहुजन आघाडीचे देवचंद केदारे यांचा पराभव केला. एकूणच प्रभागामध्ये भाजपाचे वर्चस्व स्पष्ट झाले असून, मतदारांनी दिलेल्या कौलामुळे भाजपाला तीन जागांवर यश मिळाले आहे. मात्र, अ प्रभागातील अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांच्या विजयामुळे निवडणुकीत वेगळा राजकीय संदेश गेला आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 31 अ मधील अनुसूचित जाती जागेवर भाजपाचे भगवान दोंदे यांनी दुसर्यांदा विजय मिळवला. त्यांनी शिवसेना (उबाठा) गटाचे संदीप दोंदे यांचा पराभव केला. ब गटातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेवर शिवसेना (उबाठा) गटाच्या माधुरी डेमसे यांनी भाजपाच्या माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड यांचा पराभव केला. क गटातून सर्वसाधारण महिला जागेवर वैशाली दळवी विजयी झाल्या असून, त्यांनी भाजपाच्या डॉ. पुष्पा पाटील (नवले) यांचा पराभव केला. ड गटातून सर्वसाधारण जागेवर भाजपाचे बाळकृष्ण शिरसाठ यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांचा पराभव करत विजय मिळवला. या सर्व विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जी. व्ही. एस. पवन दत्ता यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.
सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम मैदानावर सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. मात्र, ईव्हीएम मशिन्स पावणेअकरा वाजता मतमोजणी टेबलवर आणण्यात आल्याने प्रक्रियेला विलंब झाला. दुपारी एक वाजता पहिली फेरी जाहीर करण्यात आली. शहरातील बहुतांश प्रभागांचे निकाल जाहीर झाले असतानाच, दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रभाग क्रमांक 29 मधील अंतिम निकाल घोषित करण्यात आला.
प्रभाग क्रमांक 27 अ गटाची फेरमतमोजणी नाकारली
प्रभाग क्रमांक 27 अ गटातून राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)च्या उमेदवार आशा खरात यांनी मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करत फेरमतमोजणीची लेखी मागणी केली होती. मात्र, अर्जात ठोस कारण नमूद नसल्याने निवडणूक निर्णय अधिकार्यांनी ही मागणी फेटाळली. त्यानंतर आशा खरात व त्यांचे पती प्रशांत खरात यांनी घोषणाबाजी केल्याने मतमोजणी केंद्रावर तणाव निर्माण झाला. पोलिसांनी प्रशांत खरात यांना केंद्राबाहेर काढल्यानंतर समर्थकांसह मोठ्या संख्येने मतदारांनी बाहेर ठिय्या मांडला होता.
विजयानंतर जल्लोष मिरवणूक
सिडकोतील बहुचर्चित प्रभाग क्रमांक 29 मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर त्यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी विजयी मिरवणूक काढली. ढोल-ताशांच्या निनादात, फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत ही मिरवणूक संपूर्ण प्रभागातून काढण्यात आली. यावेळी परिसरातील महिलांनी मुकेश शहाणे यांचे औक्षण केले. याच प्रभागातून विजयी झालेल्या योगिता हिरे यांच्या कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त
मतमोजणीदरम्यान पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस उपायुक्त किशोर काळे, किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी हे तळ ठोकून होते. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.