भाजपचा बालेकिल्ला शिंदे गट, राष्ट्रवादीमुळे ढासळला

डिजिटल प्रचारयंत्रणा, लोकापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी टीम कार्यरत, असे असताना तब्बल पाच वेळा या भागाचे प्रतिनिधित्व केलेल्या शिवाजी गांगुर्डे यांना यावेळी मतदारांनी घरी बसविले. अभिनयातून राजकारणात एन्ट्री करू पाहणार्‍या भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांच्या कन्या नूपुर सावजी यांनाही राजकारणातील अनुभवी नेतृत्व असलेल्या डॉ. हेमलता पाटील यांनी धोबीपछाड दिला. कधीकाळी या प्रभागाचे नेतृत्व करणारे लक्ष्मण सावजी यांचा गांगुर्डे यांनी पराभव केला होता. मात्र, तेव्हापासून आजतागत सावजी यांना विजयाचा सूर काही सापडलेला नाही. यावेळी त्यांच्या कन्या
निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. भाजपाचे तिकीट असल्याने सहज बाजी मारू असा समज मतदारांनीच खोटा ठरवला. त्यामुळे भाजपची एकीकडे महापालिकेत सत्ता येत असताना शिवाजी गांगुर्डे, नूपुर सावजी यांच्या पराभवाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
महापालिका निवडणुकीच्या आधी प्रभाग 12 हा पक्षांतराच्या नाट्याने चांगलाच गाजला. काँग्रेसचा ’हात’ सोडत शिवसेना शिंदे गटात सहभागी झालेल्या डॉ. हेमलता पाटील यांचे मन शिंदे गटात काही रमले नाही. त्यांनी लागलीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची वाट धरली. सन 1992 पासून या प्रभागाचे नेतृत्व करत असलेले उत्तमराव कांबळे यांचे चिरंजीव समीर (जॉय) कांबळे यांनी काँग्रेस सोडत शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. शिवाजी गांगुर्डे आणि
समीर कांबळे हे दोघेही काँग्रेसचेच. मात्र, 2017 च्या निवडणुकीत शिवाजी गांगुर्डे यांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली.
समीर कांबळे यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा ’हात’ सोडला. दोघेही नगरसेवक आमनेसामने आल्यामुळे या लढतीकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले होते. त्यात शिवाजी गांगुर्डे यांनी तर प्रचारयंत्रणा राबविताना डिजिटल पद्धतीचा अवलंब केला. मात्र, तरीही जॉय कांबळे यांचे या भागात असलेले एकूणच हक्काचे मतदार समीर कांबळेंना विजयापर्यंत घेऊन गेले. त्यामुळे शिवाजी गांगुर्डे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.
भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले लक्ष्मण सावजी यांच्या कन्या नूपुर यांना पक्षाने उमेदवारी दिली. अभिनयात वावरणार्‍या नूपुर सावजी यांनी पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या; परंतु नंतर शिंदे गट व्हाया राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेल्या डॉ. हेमलता पाटील यांच्याशी लढत देण्याचा प्रयत्न केला. पण डॉ. पाटील यांचा या भागात असलेला वरचष्मा कायम राहिला. त्यांनी नूपुर सावजी यांचा दोन हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. महापालिकेच्या सेवेत अभियंता म्हणून काम केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने राजेंद्र आहेर यांना उमेदवारी दिली. मुळातच हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने आहेर यांना चांगला फायदा झाला. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यशाने गवसणी घातल्याने अधिकारी असलेले आहेर आता लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेत जातील. अधिकारी असताना महापालिकेत केलेल्या कामाचा व अनुभवाचा चांगला फायदा होऊ शकेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेले रंजन ठाकरे यांच्या पत्नी सीमा ठाकरे यांनीही अटीतटीच्या लढतीत या प्रभागातून बाजी मारली. समाजकार्यामुळे सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या विनोद येवले यांच्या पत्नी वर्षा येवले यांचा चारशेच्या आसपास मतांनी पराभव झाला. येवले यांनी खरेतर मोठी टीम प्रचाराला लावली होती. शिवाय सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत मतदारांमध्ये स्वत:ला नेहमी चर्चेत ठेवले होते. पण ना समाजसेवेचा उपयोग झाला, ना त्यांच्या डिजिटल टीमचा. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून हा प्रभाग ओळखला जातो. मात्र, या बालेकिल्ल्याला यावेळी सत्ताधारी पक्षातील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने धडका देत खिंडार पाडले. शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांना मिळालेल्या एकूणच मतांमुळे इतरांना आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही.

BJP’s stronghold collapsed due to Shinde group and NCP

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *