पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त
नाशिक/सिडको ः प्रतिनिधी
देशात गॅसची टंचाई असताना नाशिक शहरातील सातपूर परिसरात अवैधरीत्या वाहनांमध्ये सिलिंडरमधूून गॅस भरत असताना पुरवठा विभागाने सोमवारी (दि. 16) सायंकाळी उशिरा छापा टाकला. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. सुमारे 26 लाखांंची सामग्री जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सात आरोपींसह एका गॅस एजन्सीच्या मालकाविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. शहर व जिल्ह्यात गॅसची कमतरता असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना दुसरीकडे गॅसचा काळाबाजार सुरू असल्याची बाब पुरवठा विभागाच्या कारवाईतून समोर आली आहे. विविध भागांत बेकायदेशीर सिलिंडर साठ्याचा शोध सुरू असताना राज्यात प्रथमच अशा प्रकारचा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा निरीक्षक प्रशांत केदारनाथ सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 16 मार्च रोजी सायंकाळी पावणेसात वाजता जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी सातपूर येथील जहागीर बेकरी परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबेे, अप्पर जिल्हाधिकारी अमोल निकम, एचपीसीएलचे विक्री अधिकारी भूपेन पाटील, बीपीसीएलचे सेल्स अधिकारी राजकुमार यादव यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
या ठिकाणी नादुरुस्त एमएच 15-बीजे 2530 या क्रमांकाच्या आयशर कंपनीच्या वाहनात मोठ्या प्रमाणात एचपीसीएलचे घरगुती (14 किलो) व व्यावसायिक (पाच किलो) गॅस सिलिंडर आढळले.
एमएच 12-एलटी 6292 या क्रमांकाच्या वाहनात रिकामे सिलिंडर मोठ्या प्रमाणात सापडले. याशिवाय इतर मालवाहू वाहनांमधूनही सिलिंडर भरण्याची तयारी सुरू असल्याचे दिसले. घटनास्थळी सात मजूर व वाहनचालक उपस्थित होते.
या कारवाईदरम्यान 158 भरलेले घरगुती सिलिंडर, दहा भरलेले व्यावसायिक सिलिंडर, 273 रिकामे घरगुती सिलिंडर, तसेच इतर रिकामे सिलिंडर आणि विविध वाहने जप्त करण्यात आली. जप्त मालाची एकूण किंमत 25 लाख 73 हजार 598 रुपये आहे.
याप्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलमांंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
स्वामी समर्थ गॅस एजन्सीचा गैरकारभार उघडकीस
या चौकशीत संबंधितांनी घरगुती गॅस एका वाहनातून दुसर्या वाहनात भरून काळ्या बाजारात विक्री करत असल्याची कबुली दिली. हा व्यवसाय स्वामी समर्थ गॅस एजन्सी, महात्मानगर येथील आहे. मालक हर्षल सरनाईक असल्याचे त्यांनी सांगितले.
Black market for gas exposed in Satpur