मोहदरी-पास्ते घाटात रक्तबंबाळ अवस्थेत तरुणाचा मृतदेह

मृताच्या हातावर ‘कृष्णा’ नाव गोंदलेले

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील पालखी मार्गावरील जामगाव-पास्ते घाट परिसरात मंगळवारी (दि. 30) दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास 30 ते 32 वयोगटातील एका अज्ञात तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर तरुणाच्या पाठीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सूर्या हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळताच सिन्नर पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी, रुग्णवाहिका तसेच नाशिक येथील फॉरेन्सिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत मृताच्या पाठीवर तीक्ष्ण हत्याराने खोलवर वार करण्यात आल्याची जखम स्पष्टपणे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, मृत तरुणाच्या हातावर ‘कृष्णा’ असे नाव गोंदलेले (टॅटू) असल्याचे आढळून आले असून, त्यावरून ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. मात्र, मृताची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती.
दरम्यान, ही घटना सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते की एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग व झटापटीच्या खुणा आढळून आल्याने हा प्रकार अपघात नसून, पूर्वनियोजित हत्या असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला असून, घटनेमागील कारण, मृताची ओळख व संशयितांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या घटनेमुळे मोहदरी-पास्ते घाट परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून रात्रीच्या वेळी वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Body of a young man found in a pool of blood at Mohdari-Paste Ghat

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *