आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय
मेशी : वार्ताहर
खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नववीतील विद्यार्थिनी पल्लवी समाधान पगार (वय 14) हिचा मृतदेह शनिवारी (दि. 9) दुपारी एकला घराशेजारील विहिरीत तरंगताना आढळून आला. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला होता. मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, खडकतळे (ता. देवळा) येथील पल्लवी पगार गुरुवारी (दि. 7) कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली होती. ती घरी परत न आल्याने कुटुंबीय व नातेवाइकांनी परिसरात शोध घेतला, तसेच देवळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सलग दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी (दि.1) दुपारी घराशेजारील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते, पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी यांनी नातेवाइकांची समजूत काढली.
पोलीस तपासात आरोपी निष्पन्न झाल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. देवळा पोलिस तपास करीत आहेत.