एकुलता लेक गेला, कुटुंबाचा आक्रोश, 19 तास शोधकार्य; दीड महिन्यात दुसरी घटना
नाशिकरोड : प्रतिनिधी
बिबट्याने घराच्या ओट्यावरून हल्ला करून उचलून नेलेल्या चिमुकल्या श्रुतिकचा मृतदेह तब्बल 19 तासांच्या शोधकार्यानंतर सापडला. महिनाभरात दोन बालकांचा बिबट्याने बळी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये वन विभागाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
अवघ्या दोन वर्षांच्या श्रुतिक गंगाधर नावाच्या चिमुकल्याला त्याच्या घराच्या ओट्यावरून नरभक्षक बिबट्याने हल्ला करून उचलून नेले होते. या घटनेने संपूर्ण वडनेर परिसरात भीती आणि दहशत पसरली आहे. लष्कराचे जवान आणि वन विभागाच्या अधिकार्यांकडून श्रुतिकचा शोध घेतला जात होता. अखेर 19 तासांनंतर या दोन वर्षांच्या बालकाचा मृतदेह बुधवारी (दि. 24) दुपारी तीन वाजता आर्टिलरीच्या जंगलात आढळला आणि सर्वजण सुन्न झाले.
वडनेर गेट परिसरातील कारगिल गेटजवळ असलेल्या क्वार्टरमध्ये राहणार्या कुटुंबातील दोनवर्षीय श्रुतिक सायंकाळी घराबाहेर खेळत होता. अचानक जवळच्याच झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने क्षणार्धात त्याच्यावर झडप घातली आणि जबड्यात धरून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही कळण्याच्या आत घडलेल्या या प्रकाराने मुलाच्या आईने हंबरडा फोडला. पण तोपर्यंत बिबट्या अंधारात पसार झाला होता. यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी आर्टिलरी सेंटरचे जंगल लष्कराचे जवान व वन विभागाच्या अधिकार्यांनी पिंजून काढले. सुमारे अडीचशे ते तीनशे अधिकारी, कर्मचारी मृत बालकाचा शोध घेत होते. त्यासाठी थर्मल ड्रोन, श्वानपथक यांचा वापर करण्यात आला. त्यानंतर बुधवारी (दि. 24) दुपारी तीन वाजता श्रुतिकचा मृतदेह आर्टिलरीच्या जंगलात आढळून आला.
श्रुतिकचे वडील गंगाधर लष्करी जवान असून, ते मूळचे कर्नाटकचे आहेत. त्यांची एक वर्षापूर्वीच नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये बदली झाली होती. श्रुतिक हा एकुलता मुलगा होता. मात्र, त्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
वन विभागावर नागरिकांचा संताप
विशेष म्हणजे, मागील ऑगस्टमध्ये वडनेर दुमाला येथे आयुष भगत या तीन वर्षांच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यावेळी वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले होते. या मागणीसाठी माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मुसळधार पावसात वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारला होता. मात्र, वन विभागाच्या अजगरासारख्या सुस्त कारभारामुळे आज पुन्हा एकदा एका निष्पाप बालकाचा जीव गेला, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. अजून किती चिमुकल्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी जाण्याची वाट वन विभाग पाहणार आहे, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…