गोणीत बांधलेल्या स्थितीत आढळला युवतीचा  मृतदेह

मोखाड्यात सहा दिवसांत दुसरा मृतदेह सापडला

गोणीत बांधलेल्या स्थितीत आढळला युवतीचा  मृतदेह

मोखाडा: नामदेव ठोमरे

कुपोषण, बालमृत्यू, पाणी टंचाई याबाबत मोखाडा तालुका नेहमी चर्चेत असतो मात्र  जिल्हा बाहेरील  गुन्हा, खून याबाबतचे पुरावे नष्ट करण्यासाठी तालुक्याच्या भौगोलिक रचनेचा उपयोग केला जात आहे.

गेल्या सहा दिवसांत मोखाडा आणि खोडाळाच्या ग्रामीण भागात दोन मृतदेह आढळून आले आहेत.त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण तयार होत असून अशा घडणाऱ्या घटनांमुळे मोखाडा तालुक्याची बदनामी होत असल्याचे एकूणच चित्र आहे.
मोखाडा तालुका हा पालघर जिल्ह्यातील शेवटचे टोक असल्यामुळे नाशिक, ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतून प्रवेश करताना मोखाडा तालुका लागतो.तालुक्याचा परिसर डोंगर दरी,जंगलांनी व्यापलेला आहे.यामुळे मागील वर्षी पंधरा दिवसांत चार मृतदेह सापडले होते तर यावर्षी मात्र सहा दिवसांत दोन मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आले आहेत.अगदी २८ मार्च रोजी खोडाळा पैकी शेलमपाडा येथे ३० ते ३५ वर्षाच्या युवकांचा मृतदेह सापडला होता तर काल सोमवारच्या मध्यरात्री मोखाडा नगरपंचायत हद्दीतील घाटकरपाडा गावाजवळील वाघ नदीच्या पुलाखाली अंदाजे २५ वर्ष वयाच्या असलेल्या तरुणीचा मृतदेह सुतळी गोणीत बांधून पुलाच्या खाली टाकून देण्यात आला होता.या तरुणीला गळफास देऊन तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून तरुणीच्या अंगावर पिवळ्या रंगाचा टॉप व सफेद रंगाची लेगिझ  असुन पायाचे बोटांमध्ये चांदीचे जोडवे आहेत.तरुणी बाबतची काहीही माहिती कोणाला मिळून आल्यास मोखाडा पोलिस ठाणे येथे संपर्क करण्याचे आवाहन सहा.पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी केले आहे.
अशा घटनांचा थांगपत्ता लागू नये म्हणून गुन्हेगार तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीची निवड करतात त्यामुळे घटनांवर आळा घालण्यासाठी येथील पोलिस यंत्रणे सोबतच सर्व सामान्य लोकांनी अनोळखी व्यक्ती किंवा अनोळखी वाहने दिसल्यास पोलिसांना त्याबाबत अवगत करणे गरजेचे आहे.तेव्हाच असे गुन्हे थांबू शकतील अन्यथा गुन्हेगार राजरोसपणे तालुक्याची निवड बेवारस मृतदेह आणुन टाकण्यासाठी करीत राहतील.

“ अधिक माहितीसाठी मोखाडा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तरुणीचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदन करीता पाठविण्यात आला असून वैद्यकीय अधिकारी यांचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला पुढील माहिती मिळू शकले आणि त्यानंतर तपासाची दिशा ठरवता येईल असे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *