तामलवाडी गावाजवळील घटना;सहा गंभीर जखमी,
सिन्नर ः प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावाजवळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर कटारे मिल समोर मंगळवारी (दि.21) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास धावत्या बॅलेरो गाडीचे टायर फुटून गाडी उलटल्याने तिघांचा जागेवर चिरडून मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. निखिल रामदास सानप (23), अनिकेत बाळासाहेब भाबड (23), अथर्व शशिकांत खैरनार (22) सर्व रा. चास, ता. सिन्नर असे मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे चाससह भोजापूर खोरे परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चास येथील नऊ भाविक बॅलेरो गाडीने (क्र.एम.एच 12 ई.एक्स 3211) सोमवारी (दि.20) रात्री 10 च्या दरम्यान तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते. मंगळवारी सोलापूरहुन तुळजापूरच्या दिशेने जात होते. तूळजापूर अवघे 15 मिनीटांच्या अंतरावर राहीले असतांना तामलवाडी हद्दीत असलेल्या कटारे स्पीनिंग मिलजवळ पहाटे 6.30 वाजेच्या दरम्यान धावत्या गाडीचे पाठीमागील उजवे टायर अचानक फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत जीपमधील जखमींना बाहेर काढले. यानंतर त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात निखिल रामदास सानप, अनिकेत बाळासाहेब भाबड, अथर्व शशिकांत खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपक बबन बिडगर (23), तुषार दत्तात्रय बिडगर (21) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सोलापूर येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर गणेश ज्ञानदेव खैरनार (35), जीवन सुदाम ढाकणे (26), शंकर बाळासाहेब भाबड (23), पंकज बाळासाहेब खैरनार (28) हे चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताचा तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या पथकाने, आयआरबीच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सोलापूरला पाठवले. या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांच्या पार्थिवांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तर तामलवाडी पोलिसांनी पंचनामा करत अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.