केल्याने देशाटन, पंडित मैत्री,
सभेत संचार । शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार ॥
हे कवी मोरोपंत यांचे प्रसिद्ध सुभाषित आहे. देशाटन (प्रवास) केल्याने पंडित (विद्वान), मैत्री, सभेत संवाद आणि शास्त्र ग्रंथांचे आकलन होऊन मनुष्याला (माणसाला) अफाट चातुर्य व ज्ञान प्राप्त होते, असा या सुभाषिताचा मतितार्थ आहे. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियामुळे आणि माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे अनेक नवीन ठिकाणांचा उदय झाला असून, नाशिकसह राज्यातील भाविक पर्यटकांचा ओढा इतर राज्यांतील मंदिरे आणि पर्यटनस्थळांवर वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे, वाढत्या पर्यटकांमुळे येथील आर्थिक विकास होऊन लोकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यात आल्याने चकचकीत रस्ते, सुविधांमुळे भाविक, पर्यटक मोठ्याप्रमाणात आकर्षित होत आहेत. नाशिकलाही अशी संधी असून, छोट्या व्यावसायिकांपासून तर राजकीय पुढार्यांपर्यंत मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे.
कुंभमेळा ही एक संधी असून, संधीचे सोन्यात रूपांतर करण्याची हीच ती योग्य वेळ असून, कुंभमेळ्यानंतरही नाशिकला इतर राज्यांतील लोक पर्यटनासाठी यायला हवेत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
इतर राज्यांतील मंदिरे, धार्मिकस्थळे, पर्यटनस्थळांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. चांगले रस्ते, मोठ्या प्रमाणात भाविक आल्यास त्यांचे योग्य नियोजन, मूलभूत सुविधांचा विकास झाला असून, पर्यटक मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया किंवा माऊथ पब्लिसिटीमुळे इतर राज्यांत वळला आहे. आगामी काळात नाशिकचा कुंभमेळा होत आहे. त्यादृष्टीने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भाविक, पर्यटकांना मूलभूत सुविधा, चांगले रस्ते, विश्वासार्हता, हॉटेलिंग, राहण्याची व्यवस्था, प्रवासी भाडे आदी सर्वच बाबातीत सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.पर्यटनाबरोबर मोठी आर्थिक उलाढाल होत असते. धार्मिक, पर्यटन वाढीसाठी इतर राज्यांचा आदर्श घेत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच लक्ष केंद्रित करायला हवे.
पर्यटनातून जग कळते, असे म्हटले जाते. धार्मिक, निसर्ग पर्यटनासाठी नेहमीच प्राधान्य दिले जाते. गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियामुळे प्रसिद्ध झालेल्या ठिकाणांना गर्दी होताना दिसून येत आहे. भव्य मंदिरे आणि तेथील आरत्यांचे व्हिडिओ, भक्तांना आलेले अनुभव, पॉडकास्टमधील व्यक्तींनी उल्लेख केलेली ठिकाणे, चमत्कारिक अनुभव, तेथे होणारी अफाट गर्दी, भक्तिभाव, भाविकांच्या मते जागृत स्थाने, कलियुगातील देव म्हणून नावारूपास आलेल्या देवस्थानांना तरुणाई गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.
सिहोर (मध्य प्रदेश) येथील कुबेरेश्वर धाम हे सध्या महाराष्ट्रातील भाविकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहे. पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले बाबा) यांच्या शिवपुराण कथा आणि रुद्राक्ष वितरण उत्सवामुळे येथे दरवर्षी हजारो भाविक, पर्यटक स्वतःच्या वाहनाने, खासगी ट्रॅव्हल्सद्वारे ग्रुप करून सहली
घेऊन जातात.
पंडित प्रदीप मिश्रा यांच्यामुळे हे ठिकाण चर्चेत आले. येथे महाशिवरात्रीला मोठी गर्दी होते. या गर्दीतून मोठ्याप्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. सिहोरसारखेच कुबेर भंडारी, बागेश्वर धाम, उज्जैन, ओमकारेश्वर, स्टॅच्यू ऑफ युनिटी, नीलकंठ धाम, सालासर बालाजी, अयोध्या, खाटू श्याम या ठिकाणी महाराष्ट्रीयन भाविक पर्यटकांचे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. इन्टाग्राम रील्स आणि यूट्यूबमुळे हारे का सहारा हे ब्रीदवाक्य तरुणाईमध्येे प्रचंड लोकप्रिय झाले. राजस्थान सरकारने भाविकांच्या सोयीसाठी 100 कोटी रुपयांचा कॉरिडॉर जाहीर केला. त्यामुळे दर आठवड्याला सुमारे दोन लाख भाविक सहज दर्शन घेऊ शकतात.
उज्जैन महाकालच्या महाकाल लोकनिर्मितीनंतर उज्जैनच्या पर्यटनात 359 टक्के वाढ झाली आहे. राज्यातील ज्योर्तिलिंग दर्शनासोबत लोक उज्जैनला जाण्यास प्राधान्य देत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांत सोशल मीडियामुळे छतरपूर येथील बागेश्वरधामला जाणार्या महाराष्ट्रातील भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. खाटू श्याम दर्शनाला येणार्या भाविकांची गेल्या पाच वर्षांत 550 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. खाटू श्यामला जाणारे भाविक जवळच असलेल्या सालासर हनुमान मंदिरालाही आवर्जून भेट देतात. राममंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येला जाणार्या भाविकांच्या संख्येत 585 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पूर्वी राज्यातील पर्यटन केंद्र जसे की, पंढरपूर, शिर्डी, सिद्धिविनायक, तुळजापूर, सप्तशृंगगड, कोल्हापूर, शनिशिंगणापूर येथे भाविकांची प्रचंड गर्दी होत होती. आताही होते. परंतु, बाहेरील राज्यांतील लोकांचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रातील लोक प्रामुख्याने राममंदिर झाल्याने अयोध्या (उत्तर प्रदेश), तिरुपती (आंध्र प्रदेश), उज्जैन महाकालेश्वर (मध्य प्रदेश), द्वारका (गुजरात), वाराणसी (उत्तर प्रदेश), खाटू श्याम (राजस्थान), जगन्नाथपुरी (ओडिसा), मदुराई मीनाक्षी मंदिर, रामेश्वरम आदी ठिकाणी मोठ्याप्रमाणात जाण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
गेल्या पाच वर्षांत सोशल मीडिया आणि चांगल्या पायाभूत सुविधांमुळे खाटू श्यामसारखी काही ठिकाणे नवीन आणि लवकर प्रसिद्ध झालेली देवस्थाने समोर आली आहेत. नाशिकसह राज्यातील लोकांमध्ये या ठिकाणांची मोठी क्रेझ निर्माण झाली असून, त्यासाठी अगदी छोट्यांपासून मोठ्या लक्झरी सोयीच्या सहली काढल्या जात आहेत. खाटू श्यामसारखे ठिकाणांवर सुमारे दर आठवड्याला दोन लाखांहून अधिक भाविक येतात. त्यामुळे तेथील पर्यटन सुसाट झाले असून, हॉटेलिंग, तात्पुरत्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी स्नानगृहे, स्वच्छतागृहांची सोय भाविकांना सोयीची पडत आहे.
चांगले रस्ते, मिळणार्या सोयीसुविधांमुळे कोणतीही जाहिरात न करता तोंडी पब्लिसिटीमुळे अशा जलद व्हायरल झालेल्या ठिकाणांना प्रचंड प्रमाणात भाविक येताना दिसून येतात. समाजमाध्यमांवर किती भाविक आले आणि कुठून कुठपर्यंत प्रचंड रांगा होत्या, याबाबतचे व्हिडिओ, फोटोज्मधून या ठिकाणाची सत्यता समोर येते.
याच पद्धतीने नाशिकचे ब्रॅणिडंग करण्याची वेळ आली आहे. सोशल मीडिया, माऊथ पब्लिसिटी होण्यासाठी छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या राजकीय पुढारी, मंत्र्यांपर्यंत मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. कुंभमेळ्यानंतरही लोक नाशिकला यायला हवेत, त्यासाठी नागरिकांना मूलभूत सुविधा जसे की, शहरात आल्यानंतर स्नानगृहे, स्वच्छतागृहांची मुबलकता हवी. पर्यटक नाशिक आल्यानंतर नाशिक, त्र्यंबकेश्वर, वणी, सापुतारा, शिर्डी आणि इतर ठिकाणच्या देवस्थान किंवा पर्यटनस्थळी जाण्यासाठी चांगले रस्ते, रहिवास, हॉटेलिंग फिरण्यासाठी स्वस्त सुविधा, दरांसहित मार्गदर्शक फलक, पर्यटनकेंद्रित सुविधा देण्यात यावी.शहरात काशीविश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर रामकाल पथ उभारला जात आहे. ज्यामुळे गर्दीचे नियोजन होण्यास सोयीचे होणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणे हा उद्देश आहे. हा प्रकल्प रामकुंड ते काळाराम मंदिर आणि सीतागुंफा या ऐतिहासिक स्थळांना जोडणारा एक सलग मार्ग कॉरिडॉर म्हणून विकसित केला जात आहे. 1.3 किमी लांबीचा मार्ग असून, पादचार्यांसाठी प्रशस्त पदपथ, घाट आणि प्राचीन मंदिरांचे जतन केले जाणार आहे. प्रभू श्रीरामांच्या वनवासातील प्रसंगावर आधारित भित्तिचित्रे, शिल्पे आणि फॉरेस्ट थीम असलेली सजावट केली जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 146 कोटी रुपये असून, हे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणे, हा उद्देश सफल झाल्यास इतर राज्यांसह राज्यातील भाविक नाशिकला वळाल्यास मोठा विकास, आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
Branding celebration from Simhastha!