सिडको : विशेष प्रतिनिधी
घरगुती प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावाचे अज्ञात ठिकाणी अपहरण केल्याचा आरोप एका पित्याने आपल्या मुलावरच केला असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी रवींद्रकुमार रामलखन मौर्या (वय 60, रा. गजवक्रनगर, अश्वमेधनगर, नाशिक) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आपला मोठ्या मुलगा हिरालाल मौर्या (वय 28) याच्यावर आपल्या दुसरा मुलगा राज मौर्या याचे अज्ञात इसमांच्या मदतीने अपहरण केल्याचा आरोप केला आहे. फिर्यादी मौर्या यांनी सांगितले की, विवाहानंतर हिरालाल व त्याची पत्नी पूजा हे वेगळे राहू लागले होते. तेव्हापासून त्यांनी वेळोवेळी घराची व नाशिक, शिर्डी येथील मिळकतीवर वाटणीची मागणी करत वाद घालण्यास सुरुवात केली. दि. 10 जानेवारी रोजी त्यांच्या गजवक्रनगर येथील घरात येऊन त्यांनी पुन्हा प्रॉपर्टीवरून वाद घातला आणि राज याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर दि. 11 जानेवारीपासून लक्ष्मी फ्लोअर मिल, नानावली, भद्रकाली, नाशिक येथे राज बेपत्ता झाला. त्याला हिरालालने कोणत्यातरी अज्ञात इसमांच्या मदतीने अपहरण करून अज्ञात ठिकाणी लपवले असावे, असा ठाम संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि सत्यवान पवार करत असून, पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.