पिंपळाच्या पानावर साकारली बुद्धांची रांगोळी

सिडको : विशेष प्रतिनिधी

शांती, करुणा आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त नाशिकच्या रांगोळी कलाकार माधुरी पैठणकर यांनी एक आगळीवेगळी कलाकृती साकारली आहे. त्यांनी पिंपळाच्या पानावर रांगोळीच्या माध्यमातून गौतम बुद्धांची अत्यंत नाजूक आणि देखणी प्रतिमा रेखाटून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बुद्धपौर्णिमेनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना, या कलात्मक सादरीकरणाने एक वेगळाच आध्यात्मिक स्पर्श दिला आहे. पिंपळाचे पान हे बुद्धत्व प्राप्तीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे त्यावर गौतम बुद्धांची रांगोळी साकारणे ही फक्त एक कलाकृती नसून, त्यांच्या तत्त्वज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती देणारा प्रयत्न ठरला
आहे.
माधुरी पैठणकर यांनी आपल्या या कृतीद्वारे केवळ सौंदर्यशास्त्राची नव्हे, तर आंतरिक श्रद्धेची आणि सामाजिक जाणिवेचीही प्रचिती दिली आहे. त्यांच्या या कार्याचे विविध स्तरांवर कौतुक होत आहे. बुद्धपौर्णिमेनिमित्त नाशिक शहरात विविध ठिकाणी रांगोळी स्पर्धा, प्रदर्शनं आणि सामूहिक ध्यानसत्रांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनीदेखील यानिमित्ताने शांती व अहिंसेचा संदेश देणार्‍या रांगोळ्यांद्वारे आपली श्रद्धा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *