बसस्थानकातील स्लॅबचा मलबा हटवला

उर्वरित धोकादायक स्लॅब पाडण्याचे काम सुरू; हस्तांतरण झाल्याने परिवहन महामंडळच करणार दुरुस्ती

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नरला रविवारी (दि.25) दुपारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सिन्नरच्या हायटेक बस स्थानकाच्या फलाटावरील कोसळलेल्या गॅलरीच्या स्लॅबचा मलबा सोमवारी (दि.26) परिवहन महामंडळाने जेसीबीच्या सहाय्याने हटवला. त्याचबरोबर उर्वरित गॅलरीच्या स्लॅबचे पाडकामही जेसीबीच्या सहाय्याने संध्याकाळी हाती घेण्यात आले होते. मंगळवारी दुपारपासून बसस्थानकातील नियमित कामकाज सुरू होण्याची अपेक्षा आगारप्रमुख हेमंत नेरकर यांनी व्यक्त केली.
गॅलरीचा स्लॅब कोसळल्यामुळे बसस्थानक पूर्णपणे संरक्षित करून परिवहन महामंडळाने तिथे प्रवाशांना येण्यास मज्जाव केला होता. स्थानकात प्रवेश करणार्‍या प्रवेशद्वाराच्या जवळच बस उभ्या करण्यात येत होत्या. याशिवाय नियंत्रक आणि चौकशी कक्षाचे अधिकारी, कर्मचारी उघड्यावर टेबल टाकून वाहतुकीचे नियोजन करत होते. मात्र बस स्थानकात बसण्यासाठी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागली. याशिवाय स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागला. दरम्यान, बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर बांधलेल्या बस स्थानकाच्या डागडुजीची जबाबदारी आता स्थानक हस्तांतरित करण्यात आल्याने परिवहन महामंडळावर येऊन पडली आहे. नाशिकहून सोमवारी सुरक्षा अधिकारी यादव सानप, विभागीय कनिष्ठ स्थापत्य अभियंता नीलेश बोरकर यांनी सिन्नरला बसस्थानकात भेट देऊन तातडीने पडलेल्या स्लॅबचा मलबा हटवण्याबरोबरच उर्वरित गॅलरीचा स्लॅब काढून टाकण्याचे निर्देश दिले. संध्याकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *