नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
मांजरीच्या मागे लागलेल्या बिबट्याने मांजरीपाठोपाठ घराच्या छतावर झेप घेतल्याने भिंत पडल्याची थरारक घटना देवळाली गावाजवळील डोबी मळ्यात सोमवारी घडली. दरम्यान, वनाधिकार्यांंनी येऊन पंचनामा केला तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला.
देवळाली गावाजवळ रोकडोबावाडी आहे. येथे लष्कराच्या हद्दीत दाट जंगल आहे. बुवा, हांडोरे, लवट, औटे आदींचे शेतमळे येथे आहेत. डोबी मळ्यात अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर आहे. मळ्यातून एक मांजर उचलून नेली. दुसर्याच दिवशी सोमवारी सायंकाळी पाच वाजता बिबट्या पुन्हा मांजरीच्या मागे लागला. जीव वाचवण्यासाठी मांजर भीमानाथ बुवा यांच्या घराच्या पत्र्यावर चढली. मागे लागलेल्या बिबट्यानेही घराच्या छतावर उडी घेतली. मात्र, त्याच्या वजनामुळे घराची भिंत कोसळली आणि पत्र्यांचेही मोठे नुकसान झाले. मोठा आवाज झाल्याने परिसरातील प्रमोद बुवा, अनिल बुवा, अरुण बुवा, कैलास बुवा, गुड्डू बुवा, विश्वनाथ बुवा यांनी तातडीने धाव घेतली. माणसाची गर्दी झाल्याने बिबट्या पुन्हा जंगलाच्या दिशेने पसार झाला. मात्र, रात्री दीडच्या सुमारास बिबट्या पुन्हा आला. राजा नावाच्या बैलाच्या हंबरण्याने बुवा कुटुंब जागे झाले अन् बिबट्या
पळून गेला.
गेल्या काही वर्षांत बुवा मळ्यात आठ बिबटे वनविभागाने जेरबंद केले आहेत. पुन्हा बिबट्याचा मोठा वावर वाढला असून, सध्या चार बिबटे असल्याचे बुवा यांनी सांगितले. रात्री शेताला पाणी देण्यासाठी शेतकरी गटागटाने व हातात काठ्या घेऊनच जातात. हांडोरे मळ्यात तीन महिन्यांपूर्वी बिबट्याने मुलीवर हल्ला केला होता. डोबी मळ्यातील शेतात बिबट्या कुटुंबासह राहतो. त्यामुळे बुवा कुटुंबीयाने वाघ्या नावाचा कुत्रा पाळला आहे. बिबट्याला तो घराकडे येऊही देत नाही. मात्र, काल आजारी असल्याने तो बिबट्याला हाकलू शकला नाही. राजा नावाचा बैल हादेखील बिबट्याला घाबरत नाही. त्याच्यामुळे बिबट्याला रात्री माघार घ्यावी लागल्याचे बुवा यांनी सांगितले.