सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची मोहीम
नाशिक : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सणांच्या काळात भेसळयुक्त मिठाई सह इतर खाद्यपदार्थाची विक्री होऊ नये म्हणून विविध मोहिम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार आता अन्न प्रशासनाच्या वतीने खाद्य पदार्थ खरेदी करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सणाच्या काळात बाजारपेठेत मिठाई, खवा, मावा, नमकीन ई. अन्नपदार्थाना मोठया प्रमाणात मागणी असते. या काळात दुध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मिठाई इ. अन्न पदार्थामध्ये भेसळ होण्याची तसेच कमी दर्जाचे अन्न पदार्थ उत्पादन व विक्री होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांना सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनाने अन्न आस्थापनांच्या तपासण्या व नमुने विश्लेषणासाठी घेण्याची विशेष मोहिम हाती घेतलेली आहे. प्रशासनातर्फे ग्राहकांना सुरक्षीत व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळण्याच्या दृष्टीने खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत. प्रशासनातर्फे ग्राहकांना अन्न पदार्थ खरेदी करतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मिठाई, दुध व दुग्धजन्य व इतर अन्नपदार्थ खरेदी करतांना फक्त नोंदणी किंवा परवानाधारक आस्थापनाकडुन खरेदी करावे. मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावे. खरेदी करतांना वापर योग्य दिनांक (Use by date) पाहुनच खरेदी करावी. उघडयावरील अन्नपदार्थांची खरेदी करु नये. माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो 24 तासाच्या आत करावे, तसेच साठवणूक योग्य तापमानाला फ्रिजमध्ये करावी. मिठाईवर बुरशी आढळल्यास तसेच चव व वासामध्ये फरक जाणवल्यास ती मिठाई सेवन करु नये.
ग्राहकांनी अधिक माहिती व तक्रारी करण्यासाठी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क करण्याचे आवाहन अन्न प्रशासनाचे सह आयुक्त गणेश परळीकर यांनी केले आहे.