इगतपुरी : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष ना. अजित पवार यांनी इगतपुरी शहराची माहिती घेत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आढावा घेऊन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष फिरोज पठाण यांच्यावर निवडणुकीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. गत निवडणुकीचा आढावा पाहता राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचे नेतृत्व त्यांना देत यंदाही राष्ट्रवादी पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देत आता इगतपुरीकरांनी केवळ घोषणा करणार्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केले.
इगतपुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण यंदा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच त्यांनी त्यांच्या प्रभागात अल्पसंख्याक निधीतून सुमारे एक कोटी रुपयांच्या विकासकामांना सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांची भेट घेऊन शहरातील नागरिकांच्या असलेल्या समस्या मांडल्याने आमदारांनी त्वरित त्यांच्या निधीतून शहरातील अनेक प्रभागांत विकासकामांना सुरुवात केली. अनेक विकासकामांना मंजुरीदेखील मिळाली असून, इगतपुरी शहरात आमदार निधीतून तब्बल 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गत दोन निवडणुकीत शहरात राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण यांची ताकद जास्त असून, गेल्या 10 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून 10 नगरसेवकांचा विजय मिळविला होता. तर राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनीही नगरपरिषदेच्या निवडणुकीत लक्ष केंद्रित केले असल्याने शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकासनिधी उपलब्ध करून शहरातील नागरिकांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना (शिंदेगट) यांनी युती करून थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार शालिनी खातळे यांना उमेदवारी बहाल केली असून, काही प्रभागांत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार तर काही प्रभागांत शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
शहरातील अनेक भागांतील शासकीय भूखंडावरील नागरिकांचे घरे आहेत, मात्र त्यांचे 7/12 वर नाव नसल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा घरमालकांचे नाव 8 ड वर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच शहरातील काही भागातील झोपडपट्ट्या आहे, त्या कायम करून त्यांना पाणीपुरवठा योजना मंजूर करून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अशी कामे मंजूर…
* शहरातील बाराबंगला रोड अरब मशीदशेजारी अल्पसंख्याक समाज हॉल बांधणे – 25 लाख रुपये.
* सरदार वल्लभभाई पटेल चौक, बाराबंगला रोड ते ग्रीन शॉपपर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी – 25 लाख रुपये.
* धम्मगिरीजवळील मुस्लिम कब्रस्तान येथे भरती करणे, संरक्षक भिंत व पेव्हर ब्लॉक बसविणे – 25 लाख रुपये.
* खालची पेठ येथील कब्रस्तान येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व सुशोभीकरण करणे – 25 लाख रुपये.
या आहेत समस्या…
* युवकांसाठी कोणतीही रोजगार योजना सुरू नाही.
* आरक्षित भूखंडावर विकास नाही.
* सफाई कामगारांना घरकुल नाही.
* नगरपरिषदेमार्फत आरोग्यसेवा नाही.
* व्यवसायासाठी दुकाने (गाळे) बांधले नाही.
* सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था केली नाही.
गेल्या 30 वर्षांत नगरपरिषदेवर एकहाती सत्ता असतानासुद्धा शहराचा कोणताही विकास केला नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविल्या नसल्याने अनेकांनी शहरातून स्थलांतर केले. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून, फक्त निवडणूक आली की जागे व्हायचे व स्वत:चा विकास करायचा हे नागरिकांनी अनेक वर्षे पाहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील.कारण आम्ही अल्पसंख्याक निधीतून एक कोटी रुपयांची कामे मंजूरदेखील केली असून, कामाची सुरुवात करणार आहेत.
– फिरोज पठाण, माजी उपनगराध्यक्ष
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…