राजकीय पक्षांच्या बैठका, युतीसाठी विविध पक्षाचे पदाधिकारी आग्रही
येवला नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली असून या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चे बांधणीला लागले आहेत. विविध राजकीय पक्षाच्या बैठका सुरू असून नगराध्यक्षपद ओबीसी साठी आहेत. जनते मधून नगराध्यक्ष निवडला जाणार असून नगराध्यक्ष ओबीसी पदासाठी असल्याने इच्छुक उमेदवारात मोठी चुरस निर्माण झाली आहे. सर्वच राजकीय पक्षात नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यासंदर्भात मागील केली जात आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ पालिका निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. तर माजी खासदार समिर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप खैरे, अरुण मामा थोरात, जेष्ठ नेते अंबादास बनकर, माजी नगराध्यक्ष हुसेनभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. तसेच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पक्षाकडे नगराध्यक्ष पदासाठी अधिक प्रमाणात इच्छुक उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षात युती होण्याची दाट शक्यता वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे नगराध्यक्ष पदासाठी नऊ पदाधिकारी इच्छुक आहेत. राजेश भांडगे, दत्ता निकम, राजेंद्र लोणारी, सुहास भांबारे, अलमगिर शेख, विजय खोकले, राजश्री पहीलवान, संतोष परदेशी, दिपक लोणारी, आदीचा समावेश आहे. नऊ उमेदवार इच्छुक असले तरी उमेदवारी कोणत्या उमेदवाराला द्यायची हा निर्णय मंत्री छगन भुजबळ घेणार आहोत.
जनतेशी जनसंपर्क आणि काम करणार्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात येईल, असे संकेत माजी खासदार समिर भुजबळ यांनी दिले आहे या संदर्भात निर्णय लवकर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट, आणि काँग्रेस पक्ष, या तीन पक्षात युती होण्याची शक्यता अधिक प्रमाणात दिसून येत आहे. युती झाली तर तिन पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे . नगराध्यक्ष पद पदरात पाडून घेण्यासाठी कोणतापक्ष यशस्वी ठरतो हे पहावे लागणार आहे, युती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अँड. माणिकराव शिंदे यांच्याशी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते जयंतराव दिंडे, तालुकाध्यक्ष छगन आहेर, झुंजार देशमुख तसेच काँग्रेस पक्षाचे राजाराम पानगव्हाणे, तालुकाध्यक्ष अँड. समिर देशमुख, शहराध्यक्ष मंगल परदेशी, आदीची प्राथमिक चर्चा झाली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने डॉ. संकेत शिंदे, शितल सोनवणे, सुनंदा सोनवणे, आदी इच्छुक आहेत. तसेच पालिकेची निवडणूक शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मोठ्या ताकदीने लढवली जाणार आहेत. आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, शिवसेनेचे जेष्ठ नेते किशोर सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत जनतेशी संपर्क काम करण्याची हतोटी असलेल्या उमेदवारास उमेदवारी दिली जाईल, असे आमदार किशोर दराडे यांनी स्पष्ट केले असून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी अनेक पदाधिकारी इच्छुक आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून युती करण्या संदर्भात स्थानीक भाजपा पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीनेे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जोमात कामाला लागले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालिका निवडणूक लढवली जाणार आहेत. यासाठी पक्षाच्या बैठका, तसेच उमेदवार मुलाखती घेण्यात आल्या असून नगराध्यक्ष पदासाठी जेष्ठ नेते माजी नगरसेवक प्रमोद सस्कर, युवा नेते आनंद शिंदे, तसेच मनोज दिवटे आदी इच्छुक उमेदवार आहेत स्थानिक पातळीवर भाजपा पदाधिकारी युती करण्यासाठी इच्छुक आहेत. युती झाली नाही तर स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयार करण्यात आली आहे. पालिकेच्या निवडणुकिसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे युती,आघाडी, किंवा स्वबळावर हा निर्णय लवकरच राजकीय पक्ष घेतील असे स्पष्ट चित्र येवला शहरात पहावयास मिळत आहे.
नेत्यामध्ये सकारात्मक चर्चा:
नाशिक येथे माजी खासदार समिर भुजबळ यांनी भाजपा नेते तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन युती संदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून येवला नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असावे यासाठी आग्रह धरला आहे. दोन्ही नेत्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असुन या दोन्ही पक्षात युती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. युती संदर्भात प्राथमिक चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. अंतिम बोलणीसाठी दुसरी बैठक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मनसे स्वबळावर लढणार:
मनसे स्वबळावर निवडणूक लढणार आहे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेला आदेश निवडणुकीत पाळला जाणार आहे. ठाकरे जो निर्णय देतील तो मान्य राहील, असे मनसेचे जिल्हा नेते डॉ. राजेश पटेल, शहर प्रमुख गौरव कांबळे यांनी स्पष्ट केले . काँग्रेस पक्ष, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष गट यांच्यात युती झाली नाही तर स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.
मतदार संख्या :
येवला नगर पालिकेच्या निवडणुकीत 2025 या वर्षात दोन वार्ड वाढले आहेत 13 प्रभाग असुन 26 नगरसेवक तसेच 1 नगराध्यक्ष जनतेमधुन निवडला जाणार आहेत 4 हजाराने मतदार वाढले आहेत
मतदार संख्या पुढील प्रमाणे
♦ पुरुष मतदार —- 21259
♦ स्त्री मतदार —– 21642
♦ इतर —— 2
♦ असे एकुण — 42309
विकास कामे मार्गी:
सन 2016 मध्ये झालेल्या येवला नगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची निवडणूक जनते मधून घेण्यात आली .या निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बंडू क्षिरसागर विजयी झाले होते. पाच वर्षात नगराध्यक्ष क्षिरसागर यांनी शहरातील विकास कामे मार्गी लावली आहेत.
सन 2016 मधील नगर पालिकेतील पक्षिय बलाबल
♦ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष — 10 नगरसेवक
♦ शिवसेना पक्ष — 5
♦ भाजप — 4
♦ अपक्ष — 5
येवला शहरातील समस्या:
शहरातील विविध समस्या आजही सोडविणे बाकी आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून शहराला तिन दिवसाआड पाणी येते. त्यामुळे तर दररोज पाणी येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दररोज पिण्याचे पाणी मिळावे, शहरात सद्य स्थितीला पिण्याचे पाणी दुषीत व गढूळ येत आहे. स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी अपेक्षा आहे. शहरातील रस्त्याची अवस्था दयनीय आहे. शहरातील गंगादरवाजा चौफुली ते महात्मा फुलेनगर स्टेशनकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून उदवस्त झाला, तसेच शहरातील विविध ठिकाणी रस्ते खराब आहेत या रस्त्याचे काम करणे आवश्यक आहे. शहरातील मुंतारी शौचालयाची परीस्थिती बिकट आहे. येवला शहर हे पैठणीची बाजारपेठ असल्याने शहरात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून अनेक ग्राहक येत असतात मात्र स्वच्छतागृह खराब असल्याने त्यांना अडचण निर्माण होते, शहरातील स्वच्छतागृह व शौचालयाची नव्याने दुरुस्ती होणे गरजेचे आहे.