नाशिक : देवयानी सोनार
शत्रूंचा नायनाट करण्यासाठी भारतीय बनावटीच्या धडाडणार्या तोफा… कानठळ्या बसविणारा आवाज… जलद गतीने शत्रूच्या दिशेने झेपावणारे तोफगोळे… क्षणार्धात होणारा अचूक लक्ष्यवेध…आणि भारत माता की जय चा जयघोष… युद्धाची अनुभूती आणणारे तोफची प्रात्यक्षिकचा कार्यक्रम काल देवळाली कॅम्प येथील आर्टिलरीच्या मैदानावर पार पडला. या प्रात्यक्षिकातून भारतीय जवान कोणत्याही संकटांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली.
देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरी गोळीबार मैदानात स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडन्ट तथा रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे कर्नल कमांडन्ट लेफ्टनंट जनरल एस हरिमोहन अय्यर यांच्या अध्यक्षतेखाली तोफची प्रात्यक्षिकांचा सोहळा पार पडला.
भारतीय सैन्य दलामध्ये सहा महिन्यांपूर्वीच दाखल झालेली स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक धनुष तोफेसह, के-9 वज्र, अल्ट्रा लाइट होवित्झर, बोर्फार्स या सारख्या शक्तिशाली नऊ तोफांच्या विराट क्षमतेचे प्रदर्शन काल येथे उपस्थितांना घडविण्यात आले.
यावेळी नाशिकरोड येथील तोफखाना केंद्राचे कमांडन्ट ब्रिगेडियर ए.रागेश, विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांसह नौदल, वायूदल, भूदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
प्रात्यक्षिकादरम्यान शत्रूंच्या तळावर हल्ला चढविण्यात आला. सुरुवातीला प्रत्येक तोफांचे स्वतंत्ररित्या प्रात्यक्षिक दाखविले गेले. अखेरीस सर्व तोफांनी एकाचवेळी आपले शक्तिप्रदर्शन दर्शविल्यानंतर शत्रूच्या सर्व तळांचा क्षणार्थात खात्मा झाला. यावेळी नेपाळ या मित्रदेशातील देशातील लष्करी अधिकार्यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते.
हम भी है जोश में!
ऑपरेशन विजय’मध्ये डायमंड, ओपन पॅच, बहुला-1, बहुला-2, कॉनहिल टेम्पल, रेक्टँगल, हम्प, सगधामा, रॉकिनॉट, हरभरा, व्हाइट टेम्पल, व्हाइट क्रॉस या शत्रूंच्या तळांवर तोफांचा मारा करण्यात आला. यावेळी शत्रूला गाफील ठेवण्यासाठी अत्याधुनिक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने धुरांची भिंत तयार केली गेली. शत्रूचा तळ उद्ध्वस्त झाल्यावर जवानांचे शौर्य आणि तोफांच्या कामगिरीचे टाळ्यांचा गजरात उपस्थितांनी कौतुक केले.
आत्मनिर्भर भारत द्वारा प्रेरित होऊन स्वदेशी वज्र, धनुष, उखळी मारा करण्याची क्षमता असलेली अत्याधुनिक होवित्सर यासह आधुनिक बोफोर्स आदींचा थरार अनुभवण्याची संधी काल मिळाली.
चोख नियोजन, सुक्ष्म अभ्यास व शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर स्कूल ऑफ आर्टिलरीच्या तोपची सैनिकांनी या युद्ध अभ्यासाप्रसंगी हम भी है जोश मे हे दाखवून दिले. यावेळी मित्र राष्ट्र नेपाल सैन्याचेही अधिकारी, पुणे येथील डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ प्रशिक्षण संस्थेचेे प्रशिक्षणार्थी अधिकारी उपस्थित होते.