नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात तब्बल अठरा हजार जन्म दाखल्यांच्या नोंदी संशयास्पद असल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. सातपूर येथील मनपा कार्यालयामार्फत एका महिलेला हा बोगस दाखला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
याबाबत महापौर हिमगौरी आडके यांनी सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिले होते. आता याप्रकरणी सातपूर पोलिसांत संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख नायजा नूर मोहम्मद असे या महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात महापालिका सातपूर कार्यालयातील सहायक अधीक्षक जितेंद्र पर्डे यांनी फिर्याद दिली.
दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म-मृत्यू महापालिका नाशिक यांच्याकडील जावक क्रमांक आरोग्य अवैध नोंदी 13/ /2026 अन्वये सोबत जोडलेल्या छायांकित जन्म प्रमाणपत्र प्रतमधील अर्जदार शेख नाईजा नूर महम्मद हिचे कार्यालयात ऑनलाइन प्रणालीत सदर प्रमाणपत्रावरील नोंदणी क्रमांक 2024.9.90347.007830 हे तपासले असता सदरचे प्रमाणपत्र खोटे असून, जन्म-मृत्यू सातपूर रेकॉर्ड विभागात माहिती आढळून येत नाही. हे प्रमाणपत्र दिल्याची वेळ, दिनांक व निर्गमित करणारे प्राधिकारी हे या कालावधीत या कार्यालयामध्ये कर्तव्यावर नसल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून शेख नायजा नूर महम्मद (रा. नाशिक) यांनी शासनाची दिशाभूल करून बनावट व खोटे प्रमाणपत्र सादर केले असल्याचे सिद्ध होते. याबाबत सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी चार दिवसांपूर्वी महापालिकेत पत्रकार परिषद घेत नाशिक शहरामध्ये अशा बनावट आणि खोट्या नोंदी करणार्यांची संख्या तब्बल अठरा हजार आहे. त्यामुळे या बनावट दाखल्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
Case registered in Satpur for fake birth certificate