स्पेस ओरियन सोसायटीतील घटना; उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरातील रामनगर भागात हॉटेल विश्वंभरच्या पाठीमागे असलेल्या स्पेस ओरियन सोसायटीत बंद घरात जबरदस्तीने घुसून 40 ते 50 जणांनी 25 लाखांंची रोकड व 16 तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाइल फोन असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सीमा विलास कटारे (रा. स्पेस ओरियन अपार्टमेंट, साने गुरुजीनगर, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या बिल्डर व डेव्हलपरचा व्यवसाय करतात. दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. फिर्यादी घरी असताना कविता पवार (रा.
फुलेनगर, नाशिक) हिने आठ महिलांसह चाळीस ते पन्नास पुरुषांनी बळजबरीने घरात प्रवेश केला. त्याचा जाब विचारला असता आरोपींनी उलट उत्तर देत ‘तुझी सुपारी घेतली आहे‘ असा दम दिला. फिर्यादीच्या मुलाचा मोबाइल हिसकावून त्यातले व्हिडिओ डिलीट केले आणि त्याला मारहाणही केली. तसेच फिर्यादीस जातिवाचक शिवीगाळ करून घराबाहेर काढले. तुझी कुठेही तक्रार घेणार नाही, अशी धमकीही आरोपींनी दिल्याचा उल्लेख फिर्यादीने तक्रारीत केला आहे. नंतर फिर्यादी घरी परतल्यावर तिने पाहिले की, तिच्या दरवाजाला दुसरे कुलूप लावलेले होते व सीसीटीव्ही बसवलेला होता. घरातील सामान अस्ताव्यस्त करून ते सोसायटीच्या पार्किंगमध्ये ठेवण्यात आले होते.
दरम्यान, आरोपींकडून धमक्या मिळत राहिल्याने फिर्यादी घाबरून होती. कटारे यांनी घरात जाऊन पाहणी केल्यावर कपाटातून 25 लाख रोकड, 15 ते 16 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व दोन सॅमसंग मोबाइल चोरीस गेलेले दिसून आले. यानंतर फिर्यादी महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या फिर्यादीनुसार कविता पवार, स्नेहल भालेराव, रऊफ शेख यांच्यासह 30 ते 35 महिला व 15 ते 20 पुरुषांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.