चांदवडजवळ गोवंश तस्करीचा प्रयत्न उधळला

21 जनावरांची सुटका; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा

चांदवड : वार्ताहर
तालुक्यातील मंगरूळ शिवारात कत्तलीसाठी जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात चांदवड पोलिसांना यश आले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी 21 गोवंश जनावरांची सुटका केली आहे. सहा लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, 13 डिसेंबर रोजी पहाटे सव्वाच्या सुमारास मंगरूळ शिवारातून टाटा कंपनीचा ट्रक (एमएस 16- जी 0737) संशयास्पदरीत्या जात असल्याची गुप्त माहिती चांदवड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हा ट्रक अडवला.
ट्रकची तपासणी केली असता, त्यात 21 गोवंश जनावरे (बैल व वासरे) दाटीवाटीने आणि निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी नेली जात असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत पोलिसांनी एक लाख सहा हजार रुपये किमतीची जनावरे आणि पाच लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांची रवानगी पांजरपोळ येथे करण्यात आली आहे.
याप्रकरणी संशयित मोहसीन खान निहाल अहमद कुरेशी आणि तौफिक शेख मुक्तार शेख (दोघे रा. मालेगाव) यांच्याविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. चांदवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी भूषण साळवे यांनी फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए.जी. शिरसाट तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *