सिडकोतील उद्यानात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तोडफोड

नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण

सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडकोतील महाकाली चौक येथील उद्यानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची अज्ञात तरुणांच्या टोळक्याने नुकतीच तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, परिसरात चिंता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्रीच्या वेळेस उद्यानात टवाळखोर, मद्यधुंद तरुणांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नियमित व्यायामासाठी येणार्‍या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महिलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण आता उद्यानात येण्यास टाळाटाळ करत आहेत.गेल्या महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारे या उद्यानातील कॅमेर्‍यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी सहा ते सात आरोपींविरुद्ध कारवाई केली होती. मात्र, पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. उद्यानात सुरक्षारक्षकांची नेमणूक, सीसीटीव्हींचे दुरुस्ती व देखरेख व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. लवकरच दोषींना ओळखून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *