सप्तशृंगगड ः वार्ताहर
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंगीदेवीचा चैत्रोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात, खानदेश प्रांतातील नंदुरबार, नवापूर, धुळे, साक्री, शिरपूर, जळगाव, धरणगाव बेटावर, मालेगाव यादी विविध ठिकाणच्या पालख्या आणि पायी भाविक गडावर वाजतगाजत येत असतात. यामुळे आदिमायेचा सप्तशिखर भक्तिभावाने दुमदुमलेला दिसून येत आहे.
रामनवमीला प्रारंभ झालेली यात्रा मंगळवार, बुधवारपासून भाविकांची अलोट गर्दी दर्शनासाठी उसळली आहे. चैत्रोत्सवानिमित्त गडावर दररोज पहाटेपासून विविध धार्मिक पूजाअर्चा व विविध भक्तिभावचे कार्यक्रम दिवसभर चालत असल्याने सप्तशृंगगड परिसरामध्ये भक्तिभावाचे स्वरूप आल्याचे पहावयास मिळत आहे. दरम्यान, देवीचे महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक दररोज काढण्यात येते. यावेळी पोलिसांची चोख सुरक्षाव्यवस्था ठेवली जाते. यात्रोत्सव काळात स्वयंसेवी संघटनांनी भाविकांच्या सुविधांसाठी मोठ्या संख्येने हातभार लावल्याचे दिसून आले.
आई सप्तशृंगीचे माहेर खान्देशवाशी यांची अक्षरशः रखरखत्या उन्हात रस्त्याने भक्तिभावाचा गजर करत नाचत आईच्या दर्शनाच्या दिशेने जाताना गर्दी दिसत आहे. पायी चालत असलेल्या भाविकांसाठी काही देवीभक्तांनी अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे. परंतु, उन्हामध्ये पायी चालत असताना भाविकांचे पाण्यावाचून भयंकर हाल होताना दिसून येत आहेत.
भाविकांचे पाण्यापासून हाल होऊ नये म्हणून ग्रामपंचायत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांच्या माध्यमातून भाविकांना पाण्याच्या टँकरची व्यवस्था जागोजागी सुरू केलेली दिसून
येत आहे.
यात्रोत्सव काळात भाविकांना दोन वेळेचे अन्नदान महाप्रसाद दिले जात असून, भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात येत आहे. तसेच परिसरात सुरक्षात्मक उपाय म्हणून 24 तास अग्निशमन बंबांची व्यवस्था तसेच 24 तास वैद्यकीय, 24 तास बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे.