शिवजयंतीनिमित्त पाथर्डी फाटा, इंदिरानगर परिसरातील वाहतूक मार्गात बदल

सिडको : विशेष प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त 19 फेब्रुवारी रोजी पाथर्डी फाटा व इंदिरानगर परिसरात काढण्यात येणार्‍या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रणाबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत काही मार्गांवर वाहतुकीस बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त किरीथिका सी. एम. यांनी दिली आहे.
मिरवणुकीदरम्यान पाथर्डी फाटा येथे असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. इंदिरानगर परिसरातही उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोटार वाहन कायद्यान्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
गरवारे टी पॉईंट ते पाथर्डी फाटा या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. तसेच पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटामार्गे छत्रपती शिवाजी
महाराज पुतळ्यासमोरून अंबड-सातपूर मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग म्हणून लोकमत अप रॅम्प येथून उड्डाणपुलावरून अश्विननगर अ‍ॅक्सिस बँक डाउन रॅम्प तसेच इंदिरानगर डाउन रॅम्पमार्गे वाहतूक सुरू राहील. पाथर्डी गाव, पाथर्डी फाटा ते सातपूरकडे जाणार्‍या वाहनांसाठी पाथर्डी फाटा गारवा हॉटेल एक्सप्रेस इन हॉटेल पांडवलेणी बोगदा हा मार्ग खुला राहणार आहे.
मिरवणुकीचा मार्ग सर्व प्रकारच्या हातगाड्या, बैलगाड्या, सायकली, दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने आदींसाठी (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी 3 ते रात्री 12 या कालावधीत बंद राहील. नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. परिस्थितीनुसार वाहतूक वळविण्यात बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आल्याचेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

Changes in traffic routes in Pathardi Phata, Indiranagar area on the occasion of Shiv Jayanti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *