जिल्ह्यासह शहरात भंडार्याची उधळण करत चंपाषष्ठी साजरी

नाशिक ः चंपाषष्ठीनिमित्त गोदाघाटावरील खंडेराय मंदिरात दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी झाली होती व पूर्ण परिसर भंडार्याने न्हाऊन निघाला होता. (छाया : रविकांत ताम्हणकर)
नाशिक/पंचवटी : प्रतिनिधी
‘सदानंदाचा येळकोट…येळकोट, येळकोट जय मल्हार…’ अशा जयजयकारात बुधवारी चंपाषष्ठी उत्साहात झाली. चंपाषष्ठीनिमित्त शहरातील मंदिरांत श्री खंडेरायाचा जागर करण्यात आला. शहरातील खंडोबा मंदिरांत भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
सहा दिवसांचा उत्सव मोठ्या प्रमाणात व अतिशय भक्तिभावाने साजरा करण्यात येतो. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या खंडोबाच्या मंदिरांत रोषणाई करण्यात आली होती. तसेच चंपाषष्ठीनिमित्त विधिवत पूजा, कुलाचाराप्रमाणे तळी भरण्यात आली. बेल, दवणा, चाफ्याची आणि झेंडूची फुले वाहण्यात आली. बेल, भंडारा उधळण, महाआरती, महानैवेद्य दाखवत खंडोबाची उपासना करण्यात आली. पाच दिवस उपवासानंतर चंपाषष्ठीला उपवास सोडण्यात आला. खंडोबाला वांग्याचं भरीत, रोडगे, कांदापात आणि पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवण्यात येऊन यथासांग पूजा करण्यात आली. खंडोबाचे वाहन असलेल्या अश्व आणि श्वान यांनाही नैवेद्य देण्यात आला.
चंपाषष्ठीनिमित्त घरोघरी पारंपरिक पद्धतीने तळीभरण, विधिवत पूजन आणि कुळधर्म-कुळाचाराचे पालन करून खंडेरावास नैवेद्योपचार अर्पण करण्यात आले. शहरात गोदाकाठ, पेठ रोड, देवळाली कॅम्प आदी ठिकाणी पारंपरिक थाटात यात्रोत्सव, पूजाविधी आणि चंपाषष्ठीचा उत्सव साजरा झाला. गोदाकाठच्या श्री खंडेराव महाराज मंदिरासह शहर-जिल्ह्यातील मंदिरांना रोषणाई केली होती. पेठरोडवरील पंचवटीचा मल्हार राजा देवस्थान ट्रस्टतर्फे दिवसभर विविध कार्यक्रम झाले. वडनेरदुमाला नॉर्थ रेंज रोड येथील पाळदे मळ्याशेजारील श्री खंडेराव महाराज मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
पंचवटी परिसर दुमदुमला
भंडार्याची उधळण करून ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’ असा खंडेरायाच्या जयघोषाने पंचवटीसह परिसर दुमदुमून गेला होता. चंपाषष्ठीनिमित्ताने गोदाघाटावरील खंडोबा महाराज मंदिरात परिसरातील इतर मंदिरांतील पालख्या भेटीसाठी येत होत्या. या मंदिरात षडोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. बुधवारी पहाटेपासून पूजा, अभिषेक व महाआरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. गोदाघाटावर पश्चिमेला खंडोबा कुंडाजवळील हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे पहाटे पूजेस प्रारंभ झाला. खंडेरायाच्या टाकाची विधिवत पूजा, अभिषेक व महाआरती करण्यात आली. भाविक घरातील देव घेऊन दर्शनाला येऊन त्यांनी आणलेल्या देवांना भेटविण्यात येत होते. भाविकांना दर्शनासाठी लागणार्या लांबवरच्या रांगांसाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. शहर परिसरात दिंडोरी रोड, गोरक्षनगर आदी ठिकाणच्या खंडेरायाच्या मंदिरातील चंपाषष्ठी उत्सवात परंपरेनुसार गोदाघाटाच्या याच मंदिरापासून पालखी मिरवणुका काढण्यात आल्या. यात हिरावाडीतील शिव मल्हार मित्रमंडळ, पंचवटीचा मल्हारी राजा देवस्थानची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. रात्री पारंपरिक बोहडा व जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला. गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने खंडोबारायाचा चंपाषष्ठी उत्सव साजरा करण्यात आला.