नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी उघड

शिवसेना पदाधिकारी संतप्त; आदिवासी महिलेची नॉर्मल प्रसूती

नांदगाव ः प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या विवाहित आदिवासी तरुणीला दिवसभर बसवून ठेवून त्यानंतर नॉर्मल प्रसूती होणार नाही, असे सांगून सिझरिंगसाठी अन्य रुग्णालयात पाठविण्याची तयारी सुरू होती. मात्र, शिवसेना पदाधिकार्‍यांनी रुग्णालयातील अनागोंदी कारभार उघड केला. त्यानंतर अन्य डॉक्टरांनी रुग्णालयातच संबंधित महिलेची नॉर्मल प्रसूती केली.
जामदरी (ता. नांदगाव) येथील आदिवासी विवाहित तरुणी सोनाली आकाश मोरे (वय 19) नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी सकाळी सहाला दाखल झाली होती. तेथील डॉक्टरांनी प्रसूतीबाबत तपासणी केली व तिला थांबण्यास सांगितले. त्यानंतर तिला रक्ताची गरज आहे, ते आणण्यासाठी तिच्या कुटुंबीयांकडे तीन हजार रुपये मागितले. तेही त्यांनी दिले. त्यानंतर सोनाली हिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे तिची प्रकृती गंभीर बनली. तेव्हा सोनालीची आता नॉर्मल प्रसूती होणार नाही, असे सांगून अन्य रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलाविण्यात आली. शिवसेनेचे भाऊराव बागूल यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. तेव्हा ग्रामीण रुग्णालयात असलेले डॉक्टर व काही कर्मचारी मद्यधुंद असल्याचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांना कळविण्यात आले. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. उपस्थितीत डॉ. शांताराम राठोड मद्यधुंद असल्याने त्यांना बोलताही येत नव्हते. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षिका डॉ. काजल तुसे यांना पाचारण केले. त्यांनी सोनालीची प्रसूती केली. तीही नॉर्मल प्रसूती केली. तिला कन्यारत्न झाले. सोनालीला सिझरिंगसाठी हलविले जात होते, ती काही वेळाने नॉर्मल प्रसूत झाली. ग्रामीण रुग्णालयाचा अनागोंदी कारभार उघड झाला. दरम्यान, संतप्त शिवसैनिकांनी डॉक्टर व अन्य मद्यधुंद कर्मचार्‍यांना प्रसाद दिला. यावेळी पोलिसांना पाचारण केले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत व्हिडिओ पाठविला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांनी डॉ. राठोड यांच्यासह अन्य चौघांवर निलंबनाची कार्यवाही करणार असल्याचे सांगितले, अशी माहिती शिवसैनिकांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *