नातवाची वार्षिक परीक्षा असल्याने मी त्याचा अभ्यास घेत होते. दुसर्या दिवशी गणिताची परीक्षा असल्याने 1 ते 10 पाढे लिही, असे त्याला सांगून मी माझ्या कामाला लागले. थोड्याच वेळात पाढे लिहून नातवाने वही माझ्याकडे आणून दिली आणि स्वारी खेळायला पसार झालीसुद्धा. मी त्याचे पाढे तपासले, त्याने बरोबर लिहिले होते. पण तिरपे-तारपे कसेही लिहिले होते. एका ओळीत लिहिले नव्हते. खरं तर माझंच चुकलं होतं. मी त्याला नीट चौकट आखून दिली नव्हती. दुसर्या दिवशी नीट चौकट काढून दिल्यावर त्याने सुवाच्च अक्षरात छान पाढे लिहिले. खरंच चौकटीच महत्त्व आपल्या आयुष्यात किती असतं ना!
चौकट म्हणजे तरी काय हो—- चौकट म्हणजे नियम, चौकट म्हणजे बंधन, चौकट म्हणजे शिस्तबद्ध वर्तन, चौकट म्हणजे संस्काराची रुजवणूक. ही चौकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लहानपणापासूनच सुरू होते.लहानपणी आपल्या बालकाला आई-वडीलसारखे सांगत असतात, दुसर्याच्या वस्तूंना हात लावू नये, खोटं बोलू नये, रोज देवाचं म्हणायचं, मोठ्यांना नमस्कार करायचा, संध्याकाळी नियमित ग्राउंडवर जायचं, दिवे लागणीच्या वेळी पाढे-परवचा म्हणायच्या अशा अनेक गोष्टी बालकाला पुन्हा पुन्हा सांगून आदर्श वर्तणुकीची चौकट नकळतपणे आपण त्याच्यापुढे आखत असतो. आणि ते बालकही नकळतपणे त्या चौकटीला चिकटून राहण्याचा प्रयत्न करते आणि त्यातूनच त्याच्यावर संस्कार होतात. मूल मोठे होऊन शाळेत जाऊ लागते तेव्हा त्याची ही चौकट विस्तारते. शाळेत वेळेवर जायचे, शाळेचा गणवेश घालायचा, नियमित अभ्यास, गृहपाठ करायचा, गुरुजनांची आज्ञा पाळायची. हळूहळू या सर्व गोष्टी ते मूल अंगीकारू लागते अन् नकळत आखलेल्या चौकटीचे ते बालक पालन करू लागते.
आता बालकाचे कार्यक्षेत्र विस्तारते. निरनिराळ्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी त्याचा संबंध वाढत जातो अन् तेथील लिखित-अलिखित चौकटीचं तो पालन करू लागतो. चौकट जशी लिखित -अलिखित असते, तशीच तिला मानसिकतेचीही जोड असते.साध्या साध्या गोष्टींकरिता आपण लिखित नियमांची यादी करत नाही. मुलांनी कसे वागावे, कसे वागू नये हे आपण सारखे त्याच्यावर बिंबवित असतो. त्या दृष्टीने त्याची मानसिकता बनविण्याची प्रत्येक पालकाने जबाबदारी उचलली तर ते बालक ही उत्तमरीत्या संस्कारित बनते.
व्यक्ती तितक्या प्रकृती-या उक्तीनुसार प्रत्येक व्यक्तीच्या कार्यक्षेत्रानुसार त्याच्या चौकटीची व्याप्तीही वाढत जाते. चौकट बदलत जाते. मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिची चौकट बदलते आणि आता तिला तिच्या सासरच्या चौकटीनुसार वागावे लागते, तिला तिच्यात बदल घडवून आणावा लागतो, काही अडजेस्टमेंट करावी लागते.
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी चौकटीची बदलती दालने असतातच आणि त्या चौकटीत राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. चौकटीचं पालन करण्यानेच प्रत्येकजण योग्य वळणानेच चालतो आणि म्हणूनच समाजव्यवस्था योग्य रीतीने टिकून राहते नाही तर समाज सैरभैर व्हायला काही वेळ लागणार नाही.
अगदी साधे उदाहरण पाहू, रस्त्याने चालताना पाहिलं तर गाड्या कशाही पार्किंग केलेल्या आढळतात अन् त्यामुळे बर्याच वेळा ट्रॅफिक जॅमचा प्रश्न निर्माण होतो. मध्यंतरी महानगरपालिकेने रस्त्याच्या कडेला गाड्या पार्किंगसाठी चौकटी आखून दिल्या अन् लोकं आपोआप त्या चौकटीत बरोब्बर गाड्या पार्क करू लागले. जी गोष्ट दहा वेळा सांगून, दंड करूनही पाळली जाणार नाही, तीच गोष्ट चौकट आखून दिल्याबरोबर बिन बोभाट लोकं पालन करू लागले. माझ्या नातवाला पाढ्याकरिता आखून दिलेली चौकट आणि रहदारीच्या नियमांचं पालन व्हावं म्हणून शासनाने घालून दिलेली चौकट यात खरोखरच किती साम्य आहे ना!
प्रत्येकाने आपल्याभोवतीची चौकट समजून घेऊन त्याप्रमाणे वागले तर समाजाची, देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. गरज आहे ती चौकट समजून घेण्याची, नाही तर ऍक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा…
पुष्पा गोटखिंडीकर