रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार

लासलगाव : वार्ताहर
गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. यावर्षीही मोठी भाववाढ झाल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे.आगामी रब्बी हंगामात नियोजन करताना शेतकर्‍यांना नाकीनऊ येत आहे. ताळमेळ जुळत नसल्याची शेतकर्‍यांनी व्यथा मांडली. अलीकडच्या काळात उत्पादनवाढीसाठी शेतकर्‍यांसाठी रासायनिक खते महत्त्वाचा भाग बनला आहे.
ही गरज लक्षात घेता शासनाकडून रासायनिक खतांचे भाव गेल्या अनेक वर्षांपासून सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.दुसरीकडे उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्याने संपूर्ण अर्थचक्रच शेतकर्‍यांचे कोलमडले आहे. हंगामापूर्वीच खतांच्या किमती वाढल्याने गोणीमागे 200-250 रुपयांची वाढ झाली आहे. सुरू होत असलेल्या रब्बी हंगामात खताच्या किमती अस्मानाला भिडल्यामुळे शेतकर्‍यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार असून, उत्पादन खर्चात भर पडणार आहे.
एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नसताना खते व कीटकनाशकांच्या किमती दरवर्षी वाढत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. खतांच्या जुन्या व नवीन दरांमध्ये मोठी तफावत असून, शेतकर्‍यांना 200 ते 250 रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत. उन्हाळी कांदा व इतर पिकासाठी लागणारा रासायनिक खतांचा डोसदेखील आवश्यकच असतो. त्यामुळे शेतकरी सध्या खत खरेदी करण्यासाठी दुकानात जात आहेत. तेव्हा खतांच्या किमती वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत.निफाड तालुक्यातील शेतकरी कांदा पिकाला जास्त प्राधान्य देतात.

सध्या कांद्यासाठी एकरी चार बॅग रासायनिक खत लागत असून, खतांच्या किमतीमध्ये प्रतिगोणी 200 ते 250 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. एकीकडे शेतमालास भाव मिळत नसताना खते व कीटकनाशकांच्या किमती वाढत असल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
-बबनराव शिंदे, खत विक्रेते, लासलगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *