एसटीपी, मुकणे योजना, सीसीटीव्ही, रामकाल पथ कामाचा शुभारंभ
नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोट्यवधींची कामे होणार आहेत. येत्या गुरुवारी (दि.13) मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस नाशिक दौर्यावर येत आहेत. यावेळी ते मनपाकडून सुरू असणार्या कोट्यवधींच्या कामांचे उद्घाटन करून आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपने यापूर्वीच शंभर प्लसचा नारा दिला आहे. त्याद़ृष्टीने भाजप काही महिन्यांपासून तयारी करत आहे. भाजपने महापालिकेत सत्ता असताना कुठलीही कामे केली नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जातो. मात्र, आता सिंहस्थ कामांच्या माध्यमातून होणार्या विकासकामांच्या शुभारंभाद्वारे भाजप एकप्रकारे विरोधकांना उत्तर देणार आहे.
त्यामुळेच गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते हजारो कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन होत असताना याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यंदा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 25 हजार कोटींचा आराखडा मंजूर केल्याने नाशिकमधील हजारो कोटींची कामे यानिमित्ताने होणार आहेत. याच निधीतून सिंहस्थ व नाशिकच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होईल. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून सदर विकासकामांद्वारे विरोधकांचा समाचार घेण्याची शक्यता आहे.
खालील कामांचा होणार शुभारंभ
प्रकल्प खर्च
एसटीपी 1700 कोटी
रामकाल पथ 146 कोटी
सीसीटीव्ही कॅमेरे 296 कोटी
मुकणे पाणी पुरवठा योजना 395 कोटी
तपोवन पूल, मिलिंदनगर, वडनेर दुमाला, संत गाडगे महाराज पुलालगत रॅम्प काम 62 कोटी
नाशिकसाठी प्रकल्प ठरणार वरदान
मुकणे पाणीपुरवठा योजनेमुळे पंचवटी विभागासह नाशिक पूर्व विभागातील पाण्याची समस्या दूर होणार आहे. या प्रकल्पांतर्गत थेट विल्होळा येथून साधुग्रामपर्यंत गुरुत्ववाहिनीद्वारे पाणी आणून साधू-महंतांसह भाविकांची सोय होणार आहे. प्रस्तावित पुलांमुळे पुढील अनेक वर्षांचा प्रश्न मिटणार आहे. एसटीपी प्रकल्पामुळे गोदावरी प्रदूषणमुक्त होणार आहे. गेली कित्येक वर्षे औद्योगिक वसाहतींसह शहरातील नाल्याचे पाणी थेट गोदावरीत मिसळून नदीचे पावित्र्य नष्ट करत आहे. मात्र, या प्रकल्पामुळे गोदावरीचे पावित्र्य जपून शुद्ध पाणी नाशिककरांसह भाविकांना उपलब्ध होणार आहे.
रामकाल पथची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
केंद्र व राज्य सरकार मिळून पंचवटीत रामकाल पथ हा आध्यात्मिक कॉरिडॉर साकारणार आहे. काही महिन्यांपासून रामकाल पथचे काम प्रगतिपथावर आहे. प्रकल्पाला अडथळा ठरणारे व कुठल्याही वापराविना असलेले वस्त्रांतरगृह पाडण्यात आले. वाडेमालकांसह भाडेकरूंचे महापालिका स्वतः पुनर्वसन करणार आहे.