चांदवड : वार्ताहर
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड येथील हॉटेल निकितासमोर शनिवारी (दि. 24) रॉयल हर्ष टूर्सच्या बसचा भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात बसच्या क्लीनर साइडने समोरील वाहनाला जोरदार धडक दिल्याने बसमधील तीन महिन्यांचा बालक ठार झाला, तर एक पुरुष व एक महिला गंभीर जखमी
झाले आहेत.
रॉयल हर्ष टूर्सची बस क्रमांक ए.आर. 20 डी. 3168 ही मालेगावकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. हॉटेल निकितासमोर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरील अज्ञात वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसच्या क्लीनर बाजूला जोरात धडक बसून अपघात झाला. या धडकेमुळे बसमधील प्रवासी पुढच्या सीटला जोरात आदळले. यात टेक अने तीरुवा (रा. पचालझरना, जि. कालीकोट, देश नेपाळ) यांच्या कमरेस गंभीर मार लागला, तर महिला प्रवासी विष्णू कुमारी (40, रा. नेपाळ) हिच्या उजव्या खांद्याजवळील हाडाला गंभीर दुखापत झाली. या अपघातात टेक अने तीरुवा यांचा तीन महिन्यांचा मुलगा प्रतीक टेक तीरुवा याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी चांदवड पोलिसांनी बसचालक गुलाब नशीर मोहमंद (रा. बडेरा, जि. शिवपुरी, मध्य प्रदेश) याच्याविरोधात हयगयीने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार स्वप्नील जाधव पुढील तपास
करीत आहेत.
Child dies in bus accident near Chandwad