मनमाड ः प्रतिनिधी
मनमाडनजीक असलेल्या चांदवड तालुक्यातील दहेगाव लगत असलेल्या एकलव्य वस्ती, सरोदे वस्ती, बिडगर वस्ती, ढोमाडे वस्ती, लोणारी वस्ती आणि जवळील दहेगाव गावामध्ये स्वातंत्र्य कालखंडानंतरही लहान मुलांना शाळेत येण्या-जाण्यासाठी पक्का तर सोडा, कच्चाही रस्ता नसल्याने लहान मुलांना चिखल तुडवत शाळेत जावे लागत
आहे.
चांदवड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला हे गाव असल्याने स्थानिक आमदारदेखील याकडे दुर्लक्ष करत असून, याबाबत गावातील सरपंच, पालक तसेच ग्रामस्थांनी अनेकदा लेखी तक्रारी करूनही याकडे प्रशासन तसेच राजकीय मंडळींचे सर्रास दुर्लक्ष असल्याने आपल्या जीवावर उदार होऊन या चिमुकल्यांना शाळेत जावे लागत आहे. शासनाने आतातरी आमच्याकडे लक्ष द्यावे व आम्हाला विकसित भारत कसा आहे याचा चेहरामोहरा दाखवावा, अशी आर्त हाक या चिमुकल्या मुलांनी लगावली आहे.
दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या गावांमध्ये सुखसुविधा पोहोचल्या, मात्र चांदवड तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या व मनमाड जंक्शन स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात व वस्त्यांमध्ये अद्यापही रस्तेच पोहोचले नसल्याचे विदारक दृश्य बघायला मिळत आहे. या गावामध्ये लहान मुलांच्या शाळेच्या सोयीसाठी व रस्त्यासाठी आजही गावकरी पक्की सडक होईल, अशी आशा बाळगून आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकण्यासाठी जाणार्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखलातून रस्ता काढत मार्ग काढावा लागत आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना अनेकदा लेखी तक्रारी केल्या आहेत, मात्र याकडे त्यांचे दुर्लक्ष असून, कोणीही आमच्याकडे लक्ष देत नसल्याने आम्ही करावे तरी काय, असा सवाल या चिमुकल्यांकडून विचारला जात आहे.
गुडघाभर चिखल तसेच रस्त्यावर आडवे होणारे साप याच्यातून वाट काढत जावे लागते. शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना त्वरित रस्ता बनवून द्यावा तसेच ज्या भागात रस्ते आहेत त्या रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी. तहसीलदार, जिल्हाधिकार्यांनी आम्हाला न्याय द्यावा, ही विनंती.
– गजनंद पगारे, ग्रामस्थस्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची मी अनेकदा स्वतः ग्रामसेवक यांच्यामार्फत प्रस्ताव तयार करून बीडीओ, तहसीलदार यांच्याकडे तसेच आमदार, खासदार यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. मात्र, आम्हाला कोणीही निधी उपलब्ध करून दिला नाही. निधी उपलब्ध करून द्यावा तसेच पाठवलेल्या प्रस्तावाला मान्यता देऊन रस्ते बनवून द्यावे, ही विनंती.
– कमलबाई पगारे सरपंच, दहेगाव ग्रामपंचायत