नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका हद्दीतील पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक 7 मधील जुने पंपिंग स्टेशन, गंगापूर रोड येथे सुमारे 7.50 एकर जागेत हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडणारे स्मृती उद्यान उभारण्यात आले आहे. या स्मृती उद्याच्या शुभारंभानिमित्ताने ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने बाल महोत्सवचा शुभारंभ आज, शुक्रवारी (दि.12) होत आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते या बाल महोत्सवाचा शुभारंभ होत आहे. रविवारपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन यादरम्यान करण्यात आले आहे.
बालकांच्या व विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवे पंख देणार्या या बाल महोत्सवास आपण, आपल्या संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नक्की भेट द्यावी, असे आवाहन ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शिवसेनेचे उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले आहे.
या बाल महोत्सवाचा उद्देश मुलांमध्ये ऊर्जा संवर्धन, पर्यावरण जतन, सृजनशक्ती वाढ, विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख आणि कला-विकासाला प्रेरणा देणे, हा आहे. मुलांसाठी विविध प्रयोगशील, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बालकांच्या व विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवे पंख देणार्या हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरणार आहे.
आज, शुक्रवारी दुुपारी 4 वाजता प्रसिद्ध कॅलिग्राफीकार नीलेश गायधनी व पूजा गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली कॅलिग्राफीच्या माध्यमातून अक्षरांच्या सौंदर्याचा आणि अभिव्यक्तीच्या कलेचा अद्वितीय आविष्कार सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी यांचा मधली सुट्टी- गाणी, गप्पा आणि मज्जा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी चार वाजता वारली पेंटिंग अभ्यासक संजय देवधर यांच्याकडून आदिवासी कलांचे तंत्र अनुभव यावर आधारित वारली पेंटिंग वर्कशॉप. नंतर प्रसिद्ध कलाकार सत्यजित रामदास पाध्ये व त्यांचा अचाटराव यांच्या बोलक्या बाहुल्यांंची धम्माल. रविवारी दुपारी चार वाजता मुलांसाठी सर्जनशीलतेचा स्पर्श अवगत करणारा दुर्मिळ असा कापूस कला वर्कशॉपचे आयोजन. सायंकाळी 6 वाजता जादूगार ए. सरकार यांचे जादूचे प्रयोग सादर केले जाणार आहेत. याशिवाय थ्री इडियट्स या चित्रपटातील फुनसुख वांनडू यांचे 100 पेक्षा जास्त विज्ञान प्रयोग व करिना कपूरची स्कूटरवरील चक्की हे खास आकर्षण, तसेच बालचित्र प्रदर्शन, टॅटू मेकिंग, नेल आर्ट, लाइव्ह म्युझिक, सेल्फी पाइंट व कार्टून परेड हे खास आकर्षण असेल.
काय आहे या स्मृती उद्यानात?
प्रशस्त अॅम्फिथिएटर : नाशिकच्या युवा कलाकारांना हक्काचे 750+ क्षमतेचे व्यासपीठ. येथे स्थानिक कलाकार कला सादर करतील. ग्रंथालय + ई-लायब्ररी- समृद्ध विचारांचा महासागर. एका क्लिकमध्ये ज्ञानाचे विश्व! मुलं, तरुण, संशोधक, सर्वांना वाचनसंस्काराचा नवीन द्वार खुले होईल. धाडस, ऊर्मी आणि खेळातून निर्माण होईल एकाग्रता आणि आत्मविश्वास, असा आशियातील सर्वांत मोठा अॅडव्हेंचर पार्क. लहानग्यांसाठी रोमांचक अनुभव आणि आत्मविश्वासाचा स्टंट.
अद्ययावत कलादालन : कलेचा सन्मान, कलाकारांना स्थान. जिथे नाशिकचे युवा व्यंगचित्रकार, चित्रकार, शिल्पकार आणि छायाचित्रकार त्यांची कला प्रदर्शित करू शकतील.
सेमिनार हॉल व प्रशिक्षण केंद्र : मराठी आवाजाची ताकद आणि आधुनिक वक्तृत्व प्रशिक्षण. भाषणे, वादविवाद. इथून निर्माण होतील वक्ते व मराठी उद्योजक. कौशल्य विकास केंद्र- स्वाभिमान आणि स्वावलंबन तरुणांची नोकरी मागणारी नाही, तर नोकरी देणारी पिढी येथे तयार होईल.
कलावंतांचा नाजूक स्पर्श, प्रखर विचारांची धार, वक्तृत्वाचा जादुई मंत्र, व्यंगचित्रकाराचे फटकारे आणि मराठी माणसाचा कणा बनलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारे नाशिकचे नवे अभिमान चिन्ह. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान आज नाशिकच्या भूमीला नवी ओळख, नवा विचार आणि मराठी मनाला नवी ऊर्जा देणारे हे उद्यान आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे. युवकांच्या सृजनशक्तीला आणि जिद्दीला नवीन पंख देण्याचा आमचा संकल्प आहे.
– अजय बोरस्ते, अध्यक्ष, ऊर्जा प्रतिष्ठान तथा जिल्हाप्रमुख शिंदेसेना