सिडको : विशेष प्रतिनिधी
चुंचाळे गावात भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी सविता सागर वानखेडे यांच्या घरातून सुमारे एक लाख पाच हजार एकशे रुपये किमतीचे सोनं व चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. दुपारी ही घटना घडली असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता सागर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या घरात नसतानाच अज्ञात इसमाने त्यांच्या घराचे कुलूप तोडून किंवा इतर मार्गाने प्रवेश करून घरातील कपाट उघडून दागिन्यांची चोरी केली. याबाबत फिर्यादी सविता वानखेडे यांनी तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दिली.
फिर्यादीच्या सांगण्यानुसार चोरट्यांनी 5 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ज्यात 5 मणी व 2 वाट्या होत्या.तसेच दोन वाट्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची मुरणी, चांदीचे दागिने त्यामध्ये 2 बाजूबंद, 1 कमरपट्टा, 2 जोडवे, 1 चेनपट्टा, 1 छल्ला, 1 डोक्याचा काटा, 1 अंगठी, 1 हाताची बेडी, 2 मासोळ्या व 2 गेंद असा ऐवज चोरून नेला आहे.
या घटनेची गंभीर दखल घेऊन अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे हे करत आहेत. सध्या आरोपी अज्ञात असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गावात भरदिवसा घडलेली ही घटना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी आहे. गावकर्यांनी पोलिसांनी सतर्कता बाळगावी, सीसीटीव्ही तपासावे आणि गावात गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलिसांकडून सुरू आहे.