आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन
नाशिक ः प्रतिनिधी
दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येणार असून, शहरवासीय आणि आलेल्या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होण्याची शक्यता असून, आतापासूनच प्लास्टिकमुक्त धोरण कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्लास्टिक वापराबद्दल जनजागृती होत असली तरी हमखास बाजारातून प्लास्टिक पिशवीतूनच वस्तू, किराणा, भाजी आणली जाते. प्लास्टिक वापराबद्दल दंडात्मक कारवाई करूनही बाजारात किंवा नागरिकांकडून उल्लंघन होत आहे. प्लास्टिकचा वापर घातक असून, अनेक वर्षे त्याची झीज होत नाही. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचते. नागरिकांची मानसिकता प्लास्टिक वापराबद्दल उदासीन असून, प्लास्टिकचे दुष्परिणाम पुढील पिढीला त्रासदायक ठरू शकतील.
प्लास्टिकमुळे प्रदूषण होते.नदीनाल्यांमध्ये अडकून पडल्याने पाणी दूषित होते. डेकॉमपोझ होण्यासाठी हजारो वर्षे घेते. जाळल्याने त्यातून विषारी वायू निघतात. ते नदी प्रवाह अडवते. प्राण्यांसाठीदेखील जीवघेणे
ठरते.
आगामी काळात सिंहस्थ पर्वणी येत आहे. या काळात शहरात प्लास्टिकमुक्त वातावरण करण्याच्या निमित्ताने नुकतेच रोटरीकडूनही बाजारात कापडी पिशवी व्हेंडिंग मशिन लावण्यात आले आहे. भाजीबाजार व विविध बाजारपेठांमध्ये पर्यावरणपूरक कापडी पिशव्या वापरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे.
सिंगल यूज प्लास्टिक ना वापरता कापडी पिशव्यांचा वापर करावा. बाजारातील रेसिकलेबल कापडी पिशव्या वापराव्या प्लास्टिक पिशवीचा आग्रह करू नये, पाणी पिण्यासाठी घरून धातूची बाटली न्यावी, आपल्यापासून सुरुवात करू नाशिकला प्लास्टिकमुक्त करू.
– मीनल पलोड, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ गोदावरी
बामनोली पॅटर्न राबविण्याची गरज
गडदुर्ग संवर्धन पर्यावरणप्रेमींची मागणी
नाशिक ः प्रतिनिधी
तामिळनाडू किंवा सातार्यातील बामनोली, वासोटा किल्ल्यांवर प्लास्टिकमुक्तीसाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून, त्याची काटेकोर अंमलबजावणीही केली जात आहे. तोच पॅटर्न सर्वत्र राबविण्याची मागणी गड दुर्ग संवर्धन पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
पर्यटक, ट्रेकर्स यांनी गडकिल्ल्यांवर जाताना प्लास्टिकच्या वापरावर बदीं केली असून, पाण्याच्या बाटलीला जाते वेळी एक स्टीकर लावण्यात येते. अनामत शुल्क म्हणून 50 रुपये जमा केले जाते. परत येताना त्या पर्यटकाने, ट्रेकर्सने ती पाण्याची बाटली खाली घेऊन आल्यावर अनामत म्हणून जमा केलेले 50 रुपये पुन्हा त्यांना देण्यात येतात हे उदाहरणदाखल असले तरी असे उपक्रम राबवून अभयारण्य, वने, गडकिल्ले आदी ठिकाणी प्रवेशद्वारावर चेकपोस्टवरच अशी शिस्त लावण्यात आली असल्याने पर्यावरण संवर्धनास बळ मिळत आहे.
गडकिल्ल्यांसह प्लास्टिकमुक्त पर्यावरणासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार प्लास्टिकचा वापर कमीत कमी करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, या उद्देशाने पर्यावरणप्रेमी गडकिल्ल्यांचे सवंर्धन करताना प्लास्टिकमुक्त करण्याकडे कल दिसून येत आहे. नुकतेच ब्रह्मगिरी येथे चेकपोस्ट उभारावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
पर्यटकांना, ट्रेकर्सना आपल्या सोबत प्लास्टिक न नेण्याबद्दल आग्रही भूमीका मांडून परावृत्त केले जात असून, असा एकमेव पथदर्शी उपक्रम लवकरच होण्यासाठी गडदुर्गप्रेमींकडून प्रयत्न केले जात आहे.
संमेलनाच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबविले होते. वासोटा किल्ल्यावर जाण्यापूर्वी बामनोली हेे गाव सातार्याजवळील असून, येथूनच चेकपोस्टवर प्लास्टिक वापराबद्दल कडक कारवाई केली जाते. अशाच प्रकारचे इथेपण राबविले जावे यासाठी वनखात्याला याबाबत निवेदन दिले असून, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेला पण पत्र देणार आहोत.
– अभिजित अकोलकर, संचालक, सह्य मित्र फाउंडेशन, नाशिक