कचर्‍याचे वर्गीकरण न करणार्‍या नागरिकांंना दणका

दोनशे जणांना नोटिसा; 25 हजारांचा दंड

नाशिक : प्रतिनिधी
ओला व सुका कचर्‍याच्या वर्गीकरणाकडे दुर्लक्ष करणार्‍या नागरिकांना महापालिकेने दणका देत 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. शिवाय दोनशे नागरिकांना नोटिसा धाडल्या आहेत. कचरा वर्गीकरणाकडे दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
महापालिकेच्या घनकचरा विभागाने गेल्या आठवड्यापासून नागरिकांना ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण करूनच घंटागाडीत कचरा देण्याचे आवाहन केले होते. या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असाही इशारा दिला होता; परंतु तरीही शहरातील काही नागरिकांनी महापालिकेच्या या आवाहनास केराची टोपली दाखवली आहे. अखेर याप्रकरणी दोनशे नागरिकांना दणका देत नोटिसा धाडत 25 हजारांचा दंड ठोठावला. कचर्‍याचे वर्गीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत.
दरम्यान, येत्या काही दिवसांत कचर्‍याचे वर्गीकरण मोहीम व्यापक केली जाणार आहे. घनकचरा विभागाने सहाही विभागांतील स्वच्छता निरीक्षकांना याकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. रहिवासी सोसायट्यांसह हॉटेले, लॉन्सधारकांनाही कचर्‍याचे वर्गीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. ओला व सुका कचर्‍याच्या वर्गीकरणासाठी
महापालिका प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयांतूनही प्रबोधन केले गेले. मात्र, तरीही नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नागरिकांनी ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण करून तो घंटागाडीत द्यावा. अन्यथा याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली जाईल.
– अजित निकत, घनकचरा प्रमुख, मनपा

अशी झाली कारवाई

विभाग               नोटिसा         दंड

नाशिक पश्चिम        27                2,300

नाशिक रोड               50               14, 900

सातपूर                     50                1,100

पंचवटी                     48                 5,600

सिडको                      07               —

नाशिक पूर्व               20                3,000

एकूण                       182                25,900

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *