आडगाव ट्रक टर्मिनलवर सुरू असलेलं सिटी बस डेपोचे काम पाडलं बंद

ट्रक टर्मिनलचा प्रश्न मार्गी  लागेपर्यंत   सिटी   काम सुरू करू देणार नाही – राजेंद्र फड

नाशिक :प्रतिनिधी

आडगाव ट्रक टर्मिनलच्या प्रश्नावर वारंवार मनपा प्रशासनाची चर्चा करून देखील प्रश्न सुटत नाही. त्यातच ट्रक टर्मिनलच्या भूखंडावर सिटी बस डेपोचा घाट घातला जात असल्याने आज नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आडगाव ट्रक टर्मिनल येथे सुरू असलेलं सिटी बस डेपोचे काम बंद पाडले. तसेच जो पर्यंत ट्रक टर्मिनलचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कुठलाही काम करू दिले जाणार नाही असा इशारा अध्यक्ष राजेंद्र फड यांनी संघटनेच्या वतीने दिला आहे.आडगाव ट्रक टर्मिनल मध्ये उभारल्या जात असलेल्या इलेक्ट्रिकल बस डेपो बाबत आज नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी आज नाशिक पूर्व विधान सभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, पदाधिकारी शंकर धनावडे, सुभाष जांगडा, महेंद्र राजपूत,संजय राठी,दिपक ढिकले, शक्ती सिंग, पदम सिंग, रणधीर सिंग, नरेश बन्सल, सुभाष वाजे,रमेश महाराज, हरमेल सिंग,अमित शर्मा आदी उपस्थित होते.दरम्यान नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आज पालकमंत्री दादाजी भुसे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, मनपा आयुक्त अशोक करंजकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देखील निवेदन दिले आहे.नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या ‘एन-कॅप’ योजनेतून २५ इलेक्ट्रिक बस खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक बससाठी आडगाव ट्रक टर्मिनल आवारात स्वतंत्र बस डेपो तयार केला जाणार आहे. या बस डेपोमध्ये इलेक्ट्रिक बससह खासगी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या बस डेपोमुळे बाहेरून येणाऱ्या ट्रकला थांबण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे. नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनकडून गेल्या अनेक वर्षापासून आडगाव ट्रक टर्मिनल विकसित करून याठिकाणी सारथी सुविधा केंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्यापही मनपा प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. आता या ठिकाणी बस डेपो उभारण्यात आला तर ट्रक उभ्या करण्यासाठी जागाच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे वाहतूकदारांसमोर मोठी समस्या उभी राहणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून वाहतुकदारांची दिशाभूल होऊ नये एवढीच संघटनेची मागणी आहे. गेल्या बऱ्याच वर्षानपासुन पाठपुरावा करून कुठल्याही सुविधा तर दिल्या नाहीच वरतून गाळ्यांचे भाडे नियमित चालु ठेवलेले आहे म्हणून आता जास्त अंत पाहू नये अन्यथा संघटनेला रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.तसेच नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा इलेक्ट्रिकल बस डेपो उभारण्यास कुठलाही विरोध नाही. मात्र आडगाव ट्रक टर्मिनल चा भूखंड सोडून त्याच्या शेजारच्या जागेवर हा विकसित करण्यात यावा. जनेकरून बसडेपोचा प्रश्न सुटेल आणि वाहतूकदारांचीही प्रश्न सुटेल. त्यामुळे आडगाव ट्रक टर्मिनल मध्ये इलेक्ट्रिकल बस डेपो न उभारता तो त्याच्या नजीकच्या जागेत उभारण्यात येऊन आडगाव ट्रक टर्मिनलची जागा वाहतुकदारांसाठीच राहावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *