सिटीलिंक बस चालक, वाहकाचा प्रामाणिकपणा

 प्रवाशांचे पैसे, कागदपत्रे, मोबाईल केला परत

नाशिक : प्रतिनिधी
जगात अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याची प्रचिती सिटीलिंकच्या चालक व वाहकाने आणून दिली. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सापडलेल्या प्रवाशांच्या वस्तु तसेच रोकड संबंधित प्रवाशांना पुन्हा परत करण्यात आली.
दिनांक 19 रोजी तपोवन आगारातील बस चालक मेघराज जाधव हे निमाणी ते भगूर मार्गावर कर्तव्य बजावत असताना मागील सीटवर एक कापडी पिशवी निदर्शनास आली. मेघराज जाधव यांनी ही पिशवी तपासली असता त्यामध्ये रामप्रभू वाणी यांच्या नावाचे बँक पासबुकसह 19000/- रुपयांची रोकड मिळून आली.जाधव यांनी ही पिशवी सिटीलिंक कार्यालयात जमा केली. सिटीलिंक कार्यालयाने तात्काळ प्रवाशी रामप्रभू वाणी यांच्याशी संपर्क साधत त्यांना सिटीलिंक कार्यालयात बोलावून घेतले व संपूर्ण खातरजमा करून बँक पासबुक तसेच रोकड परत केली. मोठी रक्कम असल्यामुळे पैसे परत मिळतील अशी आशा मी सोडून दिली होती परंतु सिटीलिंक बस चालक व कर्मचारी यांनी प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रवासी रामप्रभू वाणी यांनी व्यक्त करत आभार व्यक्त केले.
दुसर्‍या एका घटनेत सीम्बायोसीस कॉलेज ते निमाणी या मार्गावर कामगिरी बजावत असलेले बस वाहक मनोहर गायकवाड यांना देखील बसमध्ये स्मार्ट फोन आढळून आला. वाहक मनोहर गायकवाड यांनी लगेचच निमाणी स्थानकातील वाहतूक नियंत्रक कल्पेश ठाकुर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तपासणी केली असता मोबाइल सौरभ चौधरी या प्रवाशाचा असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सौरभ चौधरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांचा मोबाइल परत करण्यात आला. या दोन्ही घटनेतील चालक- वाहकांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *