नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड प्रणाली कार्यान्वित
नाशिक : प्रतिनिधी
मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, कानपूर, पुणे आणि नागपूर या शहरांपाठोपाठ आता नाशिकमधील सिटीलिंकमध्ये नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. त्याद़ृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
प्रवाशांना सवलतीच्या दरातील पासेसची किंवा तत्काळ सुट्टे पैसे देऊन तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु बर्याचदा ऑनलाइन तिकीट काढताना अडचण येते किंवा सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. आता या अडचणीतून लवकरच मुक्तता करण्याच्या तयारीत सिटीलिंक असून, त्यादृष्टीने पावलेदेखील उचलण्यात येत आहेत. हे असे कार्ड आहे की, जे प्रवासी डेबिट कार्डप्रमाणेदेखील वापरू शकतील. हे प्रीपेड कार्ड असणार असून, एकदा रिचार्ज केल्यास सदर कार्डच्या केवळ एका टॅपवर प्रवाशांना सिटीलिंकमधून प्रवास करता येणार आहे. नवीन वर्षात सिटीलिंक डिजिटल पेमेंट प्रणालीचा वापर करण्याच्या तयारीत असून, यासंदर्भात पावलेदेखील उचलण्यात येत आहेत. याबाबतची अद्ययावत माहिती येत्या काही दिवसांत सिटीलिंकमार्फत प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येईल. सिटीलिंक कंपनीचा आपल्या स्थापनेपासूनच नाशिककर प्रवाशांंना अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरविण्याकडे कायमच कल राहिला आहे. (अॅटोमॅटिक व्हेईकल लोकेशन सिस्टिम), (ऑटोमॅटिक
फेअर कलेक्शन सिस्टिम), (डेली मेन्टेनन्स सिस्टिम), (सर्व्हिस लीगल अॅग्रिमेंट), कार्ड यांसह विविध अत्याधुनिक प्रणालींचा वापर सध्या सिटीलिंकमार्फत करण्यात येत आहे. लवकरच आता आणखी एक प्रणालीची यात भर पडणार आहे.
कार्डचा मेट्रो, टोलप्लाझावरही उपयोग
भविष्यात नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचा केवळ बसच नाही, तर मेट्रो, टोलप्लाझा, पार्किंग यांसारख्या वाहतूक सेवांकरितादेखील या कार्डचा वापर करता येऊ शकतो. कार्डमुळे डिजिटल पेमेंटबरोबरच प्रवासी आणि वाहक पर्यायाने सिटीलिंकसोबत असलेले नाते अधिक दृढ होणार असल्याचे सिटीलिंकने म्हटले आहे.
Citylink passengers relieved of holiday money woes