पुणे : प्रतिनिधी
राज्यात इयत्ता दहावीची लेखी परीक्षा दि. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च तर बारावीची लेखी परीक्षा दि. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालवधीत होत आहे. दहावीला राज्यभरातून 16 लाख 14 हजार 987 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर बारावीला 15 लाख 32 हजार 862 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून, 80 टक्के परीक्षा केंद्रांवर आत्तापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
सिंह म्हणाले, दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत अजून संपली नसल्याने विद्यार्थ्यांच्या नोंदणीत वाढ होईल. आत्तापर्यंत 16 लाख 14 हजार 987 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. राज्यातील 5 हजार 111 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. बारावीच्या परीक्षेला 15 लाख 32 हजार 862 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील 3 हजार 387 परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा होणार होईल. परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एकूण 80 टक्के परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर उर्वरित केंद्रांवर तातडीने कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यांची कंट्रोल रूमद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. परीक्षेसाठी जिल्हास्तरावर दक्षता समित्या कार्यरत आहेत. राज्यस्तरीय दक्षता समितीकडून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, मागील वर्षी इयत्ता बारावीला 76 आणि दहावीला 31 परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले होते. या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच यंदाही गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द केली जाणार आहे. येत्या 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताकदिनी राज्यातील सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम राष्ट्र प्रथम संकल्पनेवर आधारित असल्याने राज्यातील 1 लाख शाळांमध्ये आणि 7 लाखांपेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत व सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्याद्वारा आयोजित केला जाणार आहे. शासकीय झेंडा वंदन कार्यक्रमानंतर शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलनाचे आयोजन करावे, तसेच हा कार्यक्रम वीस मिनिटे इतक्या कालावधीचा असावा, अशा सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत.
Class 12 exams from February 10th, while class 10th exams from February 20th