पाचवरून तीन वर्षांची मुदत; 103 कोटींचे काम
नाशिक : प्रतिनिधी
विविध कारणांनी चर्चेत असलेल्या सफाई ठेक्याबाबत महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा निर्णय बदलला आहे. यापूर्वी 174 कोटींवरून 237 कोटींवर ठेका नेण्यात आल्यानंतर प्रशासनाने अनपेक्षितपणे या ठेक्याला कात्री लावत, त्यात तब्बल 134 कोटींना कात्री लावली. त्यामुळे हा ठेका आता 103 कोटींचा झाला असून, शिवाय कामाचा कालावधी पाच वर्षांऐवजी तीन वर्षांवर करण्यात आला आहे.
शहरातील साफसफाई व स्वच्छतेसाठी आउटसोर्सिंगद्वारे कंत्राटदारांकडून 875 कंत्राटी मनुष्यबळ तीन वर्षे कालावधीकरिता घेण्यात येणार आहे. दोनदा निविदा रद्द झाल्यानंतर तिसर्यांदा प्रशासनाने ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. शहराच्या दिवसेंदिवस वाढणार्या विस्तारामुळे मनुष्यबळही भरपूर लागते. त्या प्रमाणात साफसफाईसाठीचे कर्मचारी कमी पडू लागले आहेत. नव्याने विकसित होत असलेल्या कॉलनी भागांमध्ये सोयीसुविधा पुरविणे महापालिकेला मनुष्यबळाअभावी शक्य होत नसल्याने महापालिकेवर ठेक्यांच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचार्यांच्या नेमणुका करण्याची वेळ आली आहे. साफसफाई व स्वच्छतेचा ठेका आधी 237 कोटींचा होता. त्यात बदल करत हा ठेका आता 103 कोटींचा केला असून, कंत्राटी सफाई कर्मचार्यांची संख्या मागील निविदा प्रक्रियेवेळी 1175 इतकी होती. परंतु, मनुष्यबळ पुन्हा एकदा 875 इतके करण्यात
आले आहे.
1 ऑगस्ट 2020 पासून मे. वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स या ठेकेदार कंपनीला 700 सफाई कर्मचारी पुरविण्याचा ठेका दिला आहे. या ठेक्याची मुदत 31 जुलै 2023 रोजी संपुष्टात आली असून, तेव्हापासून मुदतवाढ देऊन काम केले जात आहे. नाशिक पश्चिम व पूर्व यांसह गोदाघाट परिसरात स्वच्छतेसाठी नव्याने 875 सफाई कर्मचार्यांद्वारे काम केले जाणार आहे.
ठेकेदारासाठी निर्णय बदलल्याची चर्चा?
महापालिका प्रशासनाने अचानकपणे या ठेक्यातील किंमत व कालावधी कमी केल्याने यामागील कारण काय? यावरून महापालिकेत जोरदार चर्चा होते आहे. विशिष्ट ठेकेदाराला काम मिळावे, यासाठीच हा सर्व खटाटोप असल्याची जोरदार चर्चा पालिकेत सुरू आहे.