श्रीराम मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

सिन्नर : प्रतिनिधी
जागतिक वसुंधरा
दिनानिमित्त 22 एप्रिल ते 1 मे महाराष्ट्र दिन या कालावधीत साजर्‍या होणार्‍या वसुंधरा नवरात्रोत्सव महोत्सवांतर्गत सिन्नर नगरपरिषद आणि वनप्रस्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त
विद्यमाने आणि सिन्नर शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली स्वच्छता मोहीम शनिवारी (दि. 26) माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक 11 मधील अयोध्यानगर, उद्योग भवन येथील श्रीराम मंदिर परिसरात राबविण्यात आली.
माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्यासह स्थानिक
महिलांनी व नागरिकांनी सहभाग घेऊन अयोध्यानगर येथील श्रीराम मंदिर परिसरापासून स्वच्छता
मोहीम सुरू करून रस्ते, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी महिलांनी आपल्या स्वच्छतेबाबतच्या
समस्या नगर परिषदेच्या अधिकार्‍यांना सांगून उपाय योजना करण्यास सांगितले.
तसेच नागरिकांचा सहभाग व पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत माजी नगरसेवक
सोमनाथ पावसे यांनी मांडले.
तब्बल 9 दिवस चालणार्‍या या वसुंधरा नवरात्रोत्सव
महोत्सवात पाण्याचे जलस्त्रोत पुनर्जीवित करणे, वृक्षारोपण करणे, शहरातील विविध भाग स्वच्छ करणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे इ.बाबत शाळा, महाविद्यालयात निबंध स्पर्धा घेणे व महाराष्ट्र दिनी उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा संस्थेचा सन्मान करण्यात येणार आहे.
सिन्नर शहरातील विविध सामाजिक संस्थांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले सिन्नर शहर स्वच्छ सुंदर व्हावे यासाठी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
यावेळी उदय सांगळे, सिन्नर नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, शहर समन्वयक सायली बाविस्कर, माजी नगरसेवक श्रीकांत जाधव, वनप्रस्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी वनप्रस्थ फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, सिन्नर नगर परिषदेचे अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, तसेच माजी नगरसेवक सोमनाथ पावसे, अयोध्यानगर येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *